समर्पणाला शिल्पात बांधणे आव्हानच होते
By admin | Published: January 7, 2015 01:05 AM2015-01-07T01:05:03+5:302015-01-07T01:05:03+5:30
ऊन, वारा, पाणी अशा कुठल्याही ऋतूच्या अतिरेकाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या वृत्तपत्र विके्रत्याच्या समर्पणाला शिल्पात साकारणे तसे आव्हानच होते़
शिल्पकार किरण अदाते यांची भावना
नागपूर : ऊन, वारा, पाणी अशा कुठल्याही ऋतूच्या अतिरेकाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या वृत्तपत्र विके्रत्याच्या समर्पणाला शिल्पात साकारणे तसे आव्हानच होते़ परंतु या आव्हानानेच मला बळ दिले आणि माझ्या हातून ही सुंदर आणि ऐतिहासिक कलाकृती साकारली गेली, अशा शब्दात वृत्तपत्र विक्रेत्या बंधूच्या शिल्पकृतीचे शिल्पकार किरण अदाते यांनी आपली भावना व्यक्त केली़
अदाते हे तसे मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचे़ आता मुंबईत राहतात़ दहाव्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावातच झाले़ शिक्षणाच्या या प्रवासातच शिल्पकलेची आवड निर्माण झाली व दहावीनंतर लगेच त्यांनी मुंबईच्या जे़ जे़ स्कूल आॅफ आर्ट येथे फाऊंडेशन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला़ २००६ साली मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजित एक मान्सून शोमध्ये त्यांची लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन खा़ विजय दर्डा यांच्याशी ओळख झाली व त्यांची कला बघून विजयबाबू यांनी त्यांना स्टॅचू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेसची संकल्पना सांगितली़ अदाते यांनाही ती आवडली आणि आज त्यांची ही सुरेख कलाकृती लोकमतच्या बुटीबोरी येथील प्रिटिंग युनिटची शान ठरली आहे़ या नंतर विजयबाबूंच्या मनात वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांच्या गौरवाचा विचार आला व त्यांनी अदाते यांना विक्रेत्या बांधवांचे शिल्प साकारण्याबाबत विचारले़ अदाते यांनी लगेच होकार दिला़ परंतु अगदी तांत्रिक पद्धतीने काम न करता आधी त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांचा संघर्ष समजून घेतला व नंतर शिल्प बांधणीला सुरुवात केली़ (प्रतिनिधी)
स्टेनलेस स्टील व कॉपरचा वापर
हे संपूर्ण शिल्प वेगळे व ऐतिहासिक बनविण्यासाठी अदाते यांनी स्टेनलेस स्टील व कॉपरचा वापर केला़ सायकल पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची व त्यावरील पुतळा कॉपरचा, असे हे सुंदर कॉम्बिनेशन आहे़ बुटीबोरी येथील ‘स्टॅचू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’मध्ये वृत्तपत्राच्या मजकुरासाठी अदाते यांनी कॉपर वापरला होता़ त्याच मजकुरासारखे कॉपर त्यांनी या शिल्पाला वापरले आहे ज्यामुळे शिल्पाची श्रीमंती आणखी वाढली आहे़ हे संपूर्ण शिल्प बनवायला त्यांना चार महिन्यांचा अवधी लागला़
विजयबाबू हे खरे कलेचे चाहते
विजयबाबू हे खरे कलेचे चाहते आहेत़ त्यांनी कलेवर आणि कलाकारांवर नेहमी प्रेम केले व संधीही उपलब्ध करून दिली़ माझ्या हातून हे जे ऐतिहासिक शिल्प साकारले गेले त्याचे श्रेयही विजयबाबूंना जाते़ त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो़