पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे- राज ठाकरे
By admin | Published: December 27, 2016 11:44 PM2016-12-27T23:44:38+5:302016-12-27T23:44:38+5:30
पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपा सरकारला लगावला.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - माझी स्मारकाची संकल्पना अत्यंत वेगळी आहे. पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपा सरकारला लगावला. नाशिकमधील विविध विकासकामांची पाहणी व लोकार्पणासाठी राज ठाकरे सोमवारपासून नाशकात मुक्कामी होते. मंगळवारी (दि.२७) नेहरु वनोद्यानात नूतनीकरणाच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे यांनी स्मारक कसे असते ते नाशकात येऊन बघा. ज्यांच्या नावाने आपण स्मारक उभारतो त्यांच्या आठवणींना उजाळा त्या ठिकाणी आल्यावर मिळाला पाहिजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहासाची माहिती झाली पाहिजे. नाशिकमधील गंगापूररोडवर साकारले जात असलेले दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे त्यापैकीच एक आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले. पुतळे बांधूणे म्हणजे स्मारक नाही, हे किमान लक्षात घेतले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला. राज्य सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपुर्वी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे भूमीपुजन केले होते. या अनुषंगाने ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान भाजपाच्या स्मारक कार्यक्रमावर जोरदार टिका केली. शहरात आगमन करताच त्यांनी पत्रकार परिषदेत सुरूवातीलाच राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले; मात्र शेवटी त्यांनी शिवस्मारकाबाबत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच ओघाने का होईना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकात उभारण्यात येणारे ऐतिहासिक संग्रहालयाचा उल्लेख करताना पुन्हा त्यांनी भाजपाच्या स्मारक भूमीपूजन सोहळ्यावर टीका केली.
नाशिक शहरात वनविभागाच्या पंडित जवाहरलाल नेहरु वनोद्यानात महापालिकेच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि सोयीसुविधांचा लोकार्पण सोहळा जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. तसेच गोदापात्रात पालिकेने उभारलेल्या शंभर फूटी कारंजाचाही शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेली अभिनेता भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक केदार शिंदे आदि उपस्थित होते.