बुलडाणा - भाजपा व सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर
By admin | Published: October 21, 2016 07:03 PM2016-10-21T19:03:43+5:302016-10-21T19:03:43+5:30
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कौल घेत नगरसेवक कैलास डोबे यांच्या धर्मपत्नी सीमाताई डोबे यांची भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली.
जळगाव जामोद,
बुलडाणा, दि. २१ : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कौल घेत नगरसेवक कैलास डोबे यांच्या धर्मपत्नी सीमाताई डोबे यांची भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. तर त्याच दरम्यान शिवसेनेने विद्यमान नगरसेविका द्रोपदाबाई शालीग्राम हागे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. तर दोन्ही पक्षाकडून भविष्यात वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जळगाव जामोदचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर या पदासाठी विविध पक्षांकडून कोणत्या महिलांची नावे समोर येतात याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवार २१ आॅक्टोबर रोजी भाजपाने सीमाताई कैलास डोबे व शिवसेनेचे द्रोपदाबाई शालीग्राम हागे यांच्या नावाची घोषणा केली. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उषाताई संजय ढगे यांचे नाव जाहीर झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या नगराध्यक्षपदासाठी जाहीर झालेल्या तीनही महिला एकाच समाजाच्या आहेत.
भाजपा-सेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुक्रवारी जाहीर केले असले तरी नगरसेवक पदाचे उमेदवार मात्र अद्याप कोणी जाहीर केले नाही. काँग्रेससह भारिप-बमसं व समाजवादी पार्टी यांचेही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्याप जाहीर होणे बाकी आहे. भविष्यात युती व आघाडी होणार की नाही याचे उत्तर सध्या देणे कठीण आहे. परंतु निवडणूक रणधुमाळीला सुरूवात झाली असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीही आकडेमोड मतदार करीत आहे. हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत निवडणुकीच्या वातावरणाने रंगत आणली आहे. शेवटी मतदार कोणाच्या दिशेने कौल देतो हे मतमोजणीनंतर समजत असले तरी निश्चित झालेले प्रत्येक उमेदवार आपल्या यशाची शाश्वती देत आहे.
भाजपा-सेनेच्या युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जातील
नगराच्या एकुण भवितव्यासाठी युती झालीच पाहिजे, अशी भाजपा कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. परंतु शिवसेनेने सर्व परिस्थितीचे अवलोकन करून रास्त मागणी करावी एवढीच अपेक्षा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी निश्चित प्रयत्न केले जातील.
- आ.डॉ.संजय कुटे,
प्रदेश सरचिटणीस भाजपा
भाजपा सेनेची युती व्हावी, अशी स्पष्ट भुमिका आहे. आम्ही भाजपाकडे नगरसेवकाच्या आठ जागा मागितल्या आहे ते फक्त पाच जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे युतीचा विषय थांबला आहे. युती न झाल्यास दोन्ही पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
- दत्ताभाऊ पाटील,
जिल्हा प्रमुख शिवसेना.