बुलडाण्यात खासदार कार्यालयासमोर स्फोट!
By admin | Published: February 4, 2017 02:53 AM2017-02-04T02:53:09+5:302017-02-04T02:53:09+5:30
संशयास्पद वस्तुला तोंड लावणार्या कुत्र्याच्या उडाल्या चिंधड्या
बुलडाणा, दि. 0३- खासदार प्रतापराव जाधव यांच्या जिजामाता क्रीडा संकुलातील कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान स्फोट झाला. एका संशयास्पद स्फोटक वस्तुला तोंड लावण्याचा प्रयत्न करणार्या कुत्र्याच्या या खळबळजनक घटनेत चिंधड्या उडाल्या. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू आहे.
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे येथील जिजामाता क्रीडा संकुलात कार्यालय आहे. कार्यालय बंद असताना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास कार्यालयासमोर बेवारस पडून असलेल्या एका वस्तुला कुत्र्याने तोंड लावले. कुत्र्याने तोंड लावताच त्या वस्तुचा स्फोट झाला व कुत्र्याच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. परिसरातील व्यावसायिकांनी तेथे धाव घेतली. या स्फोटात कुत्रा ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिराही त्याच ठिकाणी स्फोट झाल्याची चर्चा आजच्या घटनेनंतर उपस्थितांमध्ये होती. तथापि, गुरुवारच्या घटनेला मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून, तपास करीत आहेत.
सीसी कॅमेर्याची पाहणी
खासदार जाधव यांच्या कार्यालय परिसरात असलेल्या दुकानांसमोरील सीसी कॅमेर्याची तपासणी पोलीस करीत आहेत. .
- माझ्या कार्यालयासमोर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. हा स्फोट कशाचा झाला. त्या ठिकाणी स्फोटक वस्तू कुणी ठेवली. ती वस्तू कोणती होती, याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली आहे. ती वस्तू कुणी ठेवली की त्या ठिकाणी कशी आली, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.
खा. प्रतापराव जाधव ,बुलडाणा
घटनास्थळावर डॉग युनीट आणले व तपासणी केली. मात्र या ठिकाणी संशयास्पद काहीच आढळले नाही. कुत्र्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. प्रथमदर्शनी टवाळखोरांचा खोडसाळपणा असल्याचे निदर्शनास येत आहे.
- अंबादास हिवाळे , ठाणेदार बुलडाणा.