दूध उत्पादन प्रकल्प उभारणीत बुलडाणा जिल्ह्याचा समावेश
By Admin | Published: January 22, 2017 08:06 PM2017-01-22T20:06:53+5:302017-01-22T20:06:53+5:30
दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत/ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा, दि. 22 - दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या २१ सहकारी दूध संस्थांमध्ये सरासरी ६ हजार ३६१ प्रति. दिन लिटर दूध गोळा गेले जात असून, या प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्यातील
दूध उत्पादनात वाढ होणार आहे.
दूधाळ जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई, दूधाळ जनावरांचे कमी होत असलेली संख्या व पशुपालकांना मार्गदर्शनाचा आभाव यासरख्या अनेक समस्यांमुळे दूध उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ५६५ सहकारी दूध
संस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. परंतू सध्या यापैकी केवळ २१ संस्था सुरू आहे. तर ३८ संस्था सद्यस्थिीत बंद आहे. तर कायदेशीरबाबींच्या पूर्ततेअभावी ५०७ दुग्धसंस्था डबघाइस आहेत. परंतू आता दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणार
असून, या प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायच्या विशेष प्रकल्प उभारणीमध्ये बुलडाण्यासह अकोला, अमरावती, वर्धा नागपूर, यवतमाळ, लातुर, नांदेड, जालना व उस्मानाबाद अशा दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मात्र, यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वीच सहकारी दुध संघाचे कार्य सुरू असल्याने यवतमाळ जिल्ह्याचा या प्रकल्पात समावेश न करता चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प सन २०१७ ते २०२० या कालावधीत राबविला जाणार असल्याचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने २१ जानेवारी रोजी घेतला आहे. दूध उत्पादन वृद्धीसाठी कृत्रिम रेतनाच्या सुविधा घरपोच पुरविणे, संतुलित पशूखाद्या पुरवठा, पशुखाद्य विकास कार्यक्रम, जनावरांचे वाटप, गावपातळीवर पशुचिकित्सालय सेवा इत्यादी बाबी प्रकल्प संचालकांमार्फत राबविण्यात येणार आहेत. संस्थात्मक उभारणी कार्यक्रम गाव पातळीवरील दूध उत्पादक संघटना, दूध उत्पादकांच्या अतिरिक्त दुधाचे संकलन, दूध उत्पादकांमध्ये
जागरुकता व मनुष्यबळ प्रशिक्षण आदी बाबी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व त्यांच्या उपकंपन्यामार्फत राबविण्यात येतील. जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ होईल.
प्रकल्प व्यवस्थापन समितीची स्थापना
विदर्भ व मराठवाडा विभागात विशेष दूध उत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यासाठी दूध उत्पादन प्रकल्पाकरिता प्रकल्प व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. १० अधिकाऱ्यांच्या या समितीमध्ये प्रधान सचिव कृषी हे अध्यक्ष तर प्रकल्प संचालक सचिव व इतर आठ सदस्यांचा समावेश आहे. या समिती अंतर्गत विशेष दूध उत्पादन प्रकल्पाचे कामकाज चालणार आहे.
असे राबविणार कार्यक्रम
कृत्रिम रेतनाच्या सुविधा घरपोच पुरविणे, संतुलित पशूखाद्य पुरवठा, जनावरांचे वाटप, गावपातळीवर पशुचिकित्सालय सेवा