भूमिपुत्रांच्या घरावर बुलडोझर
By admin | Published: March 17, 2017 01:04 AM2017-03-17T01:04:39+5:302017-03-17T01:04:39+5:30
नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण परिसरातील हजारो गावांना अतिक्रमण ठरवून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. ही घरे नियमित करून स्थानिकांना, भूमिपुत्रांना न्याय द्या
मुंबई : नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण परिसरातील हजारो गावांना अतिक्रमण ठरवून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. ही घरे नियमित करून स्थानिकांना, भूमिपुत्रांना न्याय द्या, अशी आग्रही मागणी विरोधकांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
नवी मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईच्या विरोधात तेथील हजारो लोक सध्या आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. नऊ उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असून, सरकारने ताबडतोब या प्रकरणी हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र
पाटील यांनी केली. ज्यांनी सरकारला गरजेच्या वेळी आपल्या जमिनी दिल्या त्यांचीच घरे आता अतिक्रमणे ठरवून पाडली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबईत गावठाण विस्तार आणि मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. गावठाणावरील अतिक्रमणे नियमित करण्याची आश्वासने यापूर्वी देण्यात आली होती, त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली. तर, भूमिपुत्रांची घरे सिडकोच्या जागेत नाहीत. ती भूमिपुत्रांच्याच मालकीच्या जागेत आहेत. केवळ नवी मुंबईतील आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे ही समस्या उभी राहिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी केला.
या मनमानी कारभार करणाऱ्या आयक्तांवर महापालिकेत अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणीही तटकरे यांनी केली.
यावर, मानवतेच्या दृष्टिकोनातून स्थानिकांना दिलासा मिळायला हवा. आधी पुनर्वसन करून मगच अतिक्रमण काढता येईल का, याबाबत सरकारने विचार करावा, अशी अपेक्षा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. तसेच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री आणि संबंधितांची आजच्या आज बैठक बोलवावी, असे निर्देशही सभापती निंबाळकर यांनी सरकारला दिले.
यावर, तातडीने बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)