कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:17 PM2022-06-09T20:17:40+5:302022-06-09T20:18:32+5:30

कुस्ती परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र, उपमहाराष्ट्र केसरींचा गौरव

Bullet gift from Udayan Raje to Maharashtra Kesari Prithviraj Patil | कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट

कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट

Next

सातारा -  कुस्तीला कायम राजाश्रय मिळालेला आहे. पैलवानांचा आर्थिक भार सहन करुन छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराज आणि नंतर साखर कारखान्यांच्या माध्यमातून आधार मिळाला आहे. कुस्तीच्या या पंढरीतील नामवंत मल्लांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सुविधा आणि मुबलक निधी उपलब्ध करून देणार असून कुस्तीची परंपरा जपण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

उदयनराजे भोसले मित्र समूह व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना बुलेट व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना मोटार सायकल तसेच पैलवान गणेश कुंकूले, आकाश माने, सुमित गुजर यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षीस जलमंदीर येथील कार्यक्रमात देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालीम संघाचे अमर दादा जाधव, उद्योजक संग्राम बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, पैलवान सचिन शेलार, नयन पाटील, सागर भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, कुस्तीच्या पारंपरिक खेळामध्ये येणाऱ्या अडचणी मी समजून घेत असून त्याकरिता जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारणात सर्व गोष्टी करता येतात मात्र राजकारण हे राजकारणाच्या जागीच असावं ते खेळामध्ये येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी जनतेचाच आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना उदयन महाराज यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या तसेच उपस्थित सात पैलवानांना रोख बक्षिस सन्मानचिन्ह व गौरव पत्र देण्यात येणार असल्याचे उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पैलवानांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

उदयनराजेंचा आवडता क्रमांक पृथ्वीराजच्या बुलेटला
खासदार उदयनराजे भोसले यांनी कोल्हापूर आरटीओंना पत्र देऊन ०००७ हा क्रमांक पृथ्वीराज पाटील यांच्या गाडीला देण्यात यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार कोल्हापूर पासिंग असलेल्या या गाडीला एम. एच. ०९ जी. बी. ०००७ हा क्रमांक देण्यात आला आहे. उदयनराजेंकडे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांना हाच एक क्रमांक असून त्यांच्या गाड्यांची तो एक वेगळी ओळख आहे.

Web Title: Bullet gift from Udayan Raje to Maharashtra Kesari Prithviraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.