बुलेट ट्रेनचा १३५ किमीचा मार्ग ४ वर्षात, मुंबई-अहमदाबाद मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा
By नारायण जाधव | Published: June 18, 2023 06:37 AM2023-06-18T06:37:24+5:302023-06-18T06:37:35+5:30
या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत.
नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा असलेल्या पॅकेज-३ मधील ठाणे जिल्ह्यातील शीळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंतचा झरोली हा १३५.४५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीने जिंकले आहे. एल ॲण्ड टी कंपनीची १५,६९७ कोटींची निविदा एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड काॅर्पोरेशनने शुक्रवारी मंजूर केली. या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत.
एनएचएसआरसीएलने समुद्राखालील ७ किलोमीटरच्या जगातील पहिल्या बोगद्यासह बीकेसी ते शीळफाट्यापर्यंतच्या २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याच्या ६३९७ कोटींच्या कामासाठी ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्ससोबत करार केला. त्यानंतर राज्यातील सर्वात लांब १३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲण्ड टीने जिंकले. यात दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, लार्सन ॲण्ड टुब्रो, ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स-केपीटीएल आणि एनसीसी - जे. कुमार यांचा समावेश होता. १५,६९७ कोटींची निविदा भरणाऱ्या लार्सन ॲण्ड टुब्रोने बाजी जिंकली.
पॅकेज ३ मध्ये या कामांचा आहे समावेश
महाराष्ट्र राज्यातील शीळफाटा आणि झरोलीदरम्यान ठाणे, विरार आणि बोईसर या उन्नत स्थानकांसह १३५ किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्ट्स, पूल आणि माउंटन टनेलच्या सिव्हिल आणि बिल्डिंग कामांच्या डिझाइन आणि बांधकामाचा समावेश आहे. या मार्गात नद्यांवरील ११ पूल, डोंगरांखालील ६ बोगदे आणि इतर ३६ पुलांचा समावेश आहे. राज्यातील तुंगारेश्वर अभयारण्यासह पालघर जिल्ह्यातील पर्यावरणीयदृष्ट्या अनेक संवेदनशील भागातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे.
बीकेसी भूमिगत स्थानकाचे काम सुरू
मुंबईतील बीकेसी येथील भूमिगत स्थानकाचे कंत्राट एमएईआयएल-एचसीसी कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीची ३६८१ कोटींची निविदा मान्य करण्यात आली. ४.९ हेक्टरवर हे स्थानक होणार असून, यात फलाटांची लांबी ४१४ मीटर आहे. येथून १६ काेचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकेल.
भिवंडी तालुक्यात असणार डेपो
भारोडी व अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो असेल. बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिंकनसेन ट्रेन-सेटची देखभाल या ठिकाणी करण्यात येणार आहे. साबरमती डेपोनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डेपो असणार असून, आणखी एक डेपो सुरत येथे बांधण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची पाच हजार कोटींची हिस्सेदारी
सत्तेवर येताच शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारचे शेअर खरेदीसाठी सहा कोटी रुपये वितरित केले आहेत. या प्रकल्पात केंद्र सरकारची दहा हजार कोटी अर्थात ५० टक्के तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी २५ टक्के अर्थात पाच हजार कोटींची हिस्सेदारी आहे.