बुलेट ट्रेनची सुरुवात बीकेसीतूनच होणार ?
By admin | Published: December 24, 2014 02:47 AM2014-12-24T02:47:31+5:302014-12-24T02:47:31+5:30
बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सुरुवात ही वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
जमीर काझी, मुंबई
बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सुरुवात ही वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारडेपोसाठीला आवश्यक असणारी जागा वांद्रे टर्मिनल्स येथे असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असून, जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होईल, असे मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी मुंबईत सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच रेल्वे अंदाजपत्रकामध्ये त्याचा समावेश करून मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर रेल्वे सुरू करण्याचे जाहीर केले. ५३४ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील व्यापार अधिक दृढ होणार आहे.
वाणिज्यिक क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या बीकेसीची बुलेट ट्रेनशी कनेक्टिव्हिटी झाल्यास त्याचा मोठा फायदा या परिसराला मिळणार आहे. प्रति तास ३०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग, स्थानकांच्या नियोजनाचा प्राथमिक आराखडा बनविण्यात आलेला नाही. त्यासाठी वांद्रे टर्मिनल्स किंवा टिळकनगर टर्निनल्स हे दोन पर्याय उपलब्ध आहेत, मात्र त्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून काहीही पत्रव्यवहार करण्यात आला नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.