सराफा बाजार तेजीत

By admin | Published: April 26, 2017 12:46 AM2017-04-26T00:46:07+5:302017-04-26T00:46:07+5:30

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफा बाजारात सोने खरेदीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

Bullion market rally | सराफा बाजार तेजीत

सराफा बाजार तेजीत

Next

चेतन ननावरे / मुंबई
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफा बाजारात सोने खरेदीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. नोटाबंदीनंतर सुनासुना असलेल्या सराफा बाजारात गुढीपाडव्याला सरासरी सोने खरेदीनंतर सराफांचे लक्ष अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताकडे लागले होते. ऐन मुहूर्तावेळी अंदाजाप्रमाणे सोन्याचा प्रतितोळा दर ३० हजार रुपयांखाली असल्याने दागिन्यांची बुकिंग करण्यासाठी सराफा बाजारात ग्राहकांची लगबग वाढल्याचे चित्र दिसत आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पाहावा लागत नाही. त्यामुळे किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सणादिवशी सराफा पेढीत येऊन दागिने खरेदी करतात. मात्र लग्नसराईचे दिवस असल्याने बहुतेक ग्राहक मोठ्या आकाराचे दागिने अक्षय्य तृतीयेदिवशी मिळावेत म्हणून आधीच बुकिंग करत आहेत. त्यामुळे सराफा बाजारात लगबग दिसत असल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.
दरम्यान, नोटाबंदीनंतर थंडावलेल्या सराफा बाजाराने गुढीपाडव्याला काहीअंशी उचल खाल्ल्याचे चित्र होते. मात्र पाडव्याला सरासरी बाजार झाल्यानंतरही अक्षय्य तृतीयेला रेकॉर्डब्रेक कमाई होण्याची अपेक्षा सराफांना आहे. त्यामुळेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफांकडून विविध आॅफर्सचा भडिमार सुरू आहे. यामध्ये काही नामांकित सराफांनी तर सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. तर काही सराफांनी ठरावीक किमतीपुढील दागिन्यांवर घडणावळच माफ केल्याच्या आॅफर्सही जाहीर केल्या आहेत.

Web Title: Bullion market rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.