‘सराफा बंद’मुळे सोने खरेदीचा मुहूर्त चुकला; वस्तूखरेदीला पसंती

By admin | Published: April 9, 2016 03:40 AM2016-04-09T03:40:29+5:302016-04-09T03:40:29+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफांचा बंद कायम राहिल्याने सोने खरेदीसाठी आतुर असलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले.

'Bullion shutdown' failed to buy gold; Favorites | ‘सराफा बंद’मुळे सोने खरेदीचा मुहूर्त चुकला; वस्तूखरेदीला पसंती

‘सराफा बंद’मुळे सोने खरेदीचा मुहूर्त चुकला; वस्तूखरेदीला पसंती

Next

चेतन ननावरे,  मुंबई
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफांचा बंद कायम राहिल्याने सोने खरेदीसाठी आतुर असलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले. दुसरीकडे बँक व्याजदरात झालेल्या कपातीमुळे घर आणि वाहन खरेदीत अधिक उत्साह दिसून आला.
अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेला बेमुदत बंद गुढीपाडव्यालाही कायम राहिला. परिणामी, गेल्या ३८ दिवसांपासून सोने खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना सोने खरेदीसाठी आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे. सराफांच्या बंदमुळे सोन्याचे बाँड खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाने खरेदी होत असल्याने बाँडला तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले.
उटगी म्हणाले की, सोन्याची नाणी देणे बँकांनी गेल्या काही वर्षांत बंद केले आहे. सोन्याच्या आयातीवर निर्बंध यावेत, म्हणून शासनाने ग्राहकांना घरातील सोने बँकेत ठेवण्याचे आवाहन केले होते, त्यासाठी आकर्षित व्याजदर देण्याचा प्रयत्न केला. मात्र गुढीपाडव्याला त्या योजनेलाही प्रतिसाद मिळालेला नाही. रिअल इस्टेटमध्ये मात्र नेहमीच्या मानाने अधिक उत्साह दिसून आल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर आॅफ हाउसिंग सोसायटीचे (एमसीएचआय) अध्यक्ष धर्मेश जैन यांनी सांगितले. घरांच्या किमतीत आणि बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या गृहकर्जात घट झाल्याने ग्राहकांना घर खरेदी करण्याची उत्तम संधी आत्ता आहे. सध्या अनेक ठिकाणी गृह प्रकल्पांचे प्रदर्शन भरले असून, मोठ्या प्रमाणात गृह खरेदीसाठी चौकशी होत आहे. त्याचे रूपांतर घरांच्या बुकिंगमध्ये कितपत होईल, हे येत्या दोन दिवसांत कळेल.

Web Title: 'Bullion shutdown' failed to buy gold; Favorites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.