बैलगाडीलाही आता शॉकअॅब्सॉर्बर
By admin | Published: December 5, 2014 09:57 PM2014-12-05T21:57:10+5:302014-12-06T00:32:44+5:30
विद्यार्थिनींनी केली विज्ञानक्रांती : बैलांच्या मानेवरील वजन होणार कमी
वाई : बावधन येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनात पश्चिम व दुर्गम भागातील श्री केदारेश्वर आकोशी माध्यमिक विद्यालयाच्या ‘श्रम परिहार’ बैलगाडी या वाहनासाठी तयार केलेल्या उपकरणाला द्वितीय पुरस्कार मिळाला. या उपकरणामुळे भविष्यात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीना हे उपकरण फायदेशीर ठरणार असल्याची खात्री देण्यात येत आहे. बावधन, ता. वाई येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये वाई तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला होता. या प्रदर्शनात आकोशी, ता. वाई या पश्चिम व दुर्गम भागातील विद्यार्थिनींनी शेती व इतर साहित्य वाहतूक करणारी बैलजोडीवर चालणारी बैलगाडीच्या बैलाच्या खांद्यावर राहणाऱ्या जोकडाला दुचाकी वाहनाच्या हॅन्डेलसह खाली त्याला शॉकअॅब्सॉर्बर व पाईप आणि फिरते चाक जोडून केलेले उपकरण जोडून त्यामुळे बैलाच्या मानेवर बसणारा भार हलका होऊन याचा अधिक फायदा ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीस होईल. त्यासाठी आवश्यक बदल करण्यात येईल, असे सांगण्यात आले. शेतीसाठी बैलगाडी हे पारंपरिक विना इंधन बैलावर चालणारे वाहन आहे. आजही खेडेगावात त्याचा वापर तसेच ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या उपकरणामुळे बैलाच्या खांद्यावर येणारा बोजा कमी होणार असून त्याला शॉकअॅब्झर असल्याने ते कोणत्याही रस्त्यावर चालणार आहे. ऊस वाहतुकीसाठी त्यात काही बदल करून त्याची प्रात्यक्षिक लवकर घेण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या शेवटी पहिल्या तीन क्रमांकाच्या शाळेस गटशिक्षण अधिकारी एच. व्ही. सणस, माजी सभापती दिलीप पिसाळ, उपशिक्षणाअधिकारी संगीता यादव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सहदेव भणगे, मुख्याध्यापक विजय येवले यांनी व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. त्यांना मार्गदर्शन नितीन देसाई यांनी केले. (प्रतिनिधी) लवकरच प्रात्यक्षिक या उपकरणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीस अधिक प्रमाणात उपयोग होणार याबाबत आवश्यक ते बदल करून लवकरच त्याचे प्रात्यक्षिक किसनवीर कारखान्यावर घेण्यात येणार आहे. बैलगाडीत जादा वजन भरल्यास त्याचा भार बैलांच्या खांद्यावर यायचा, या उपकरणामुळे तो हलका होऊन बैलांना कष्ट व त्रास कमी होईल. बैलाच्या खांद्यावरच्या जोकडाची उंची व त्याला शॉकअॅब्झर असल्याने ते कोणत्याही रस्त्यावर वापरा येत आहे. महादेव भणगे, शेतकरी