'बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ', उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 05:01 PM2017-08-11T17:01:10+5:302017-08-11T17:03:54+5:30
बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असून यामुले बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्ते अजय मराठे यांनी नमूद केलं आहे
मुंबई, दि. 11 - बैलगाडी स्पर्धेच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असल्याचं सांगत अधिसूचनेला याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे. अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असून यामुले बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्ते अजय मराठे यांनी नमूद केलं आहे. बैल हा धावण्याकरिता नाही तर कष्टाची कामं करण्यासाठी आहे असंही याचिकेतून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली असल्याने कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे. यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील. महाराष्ट्राचं पशुसंवर्धन खातं यासंबंधी अधिसूचना काढणार आहे.
एप्रिल महिन्यात विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता. यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला जाईल. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं होतं आणि एकमताने मंजूरही झालं होतं. बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामीळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती -
- बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
- खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
-विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.