अवैध व्यावसायिकांची गुंडगिरी
By admin | Published: June 9, 2017 02:32 AM2017-06-09T02:32:33+5:302017-06-09T02:32:33+5:30
भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर अवैधपणे व्यवसाय करणारे व्यापारी सुरक्षा रक्षकांसह एपीएमसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे निदर्शनास आले
नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर अवैधपणे व्यवसाय करणारे व्यापारी सुरक्षा रक्षकांसह एपीएमसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयात घुसून शिवीगाळ केली जात आहे. गुंडगिरीच्या बळावर बिनधास्तपणे रोड व पदपथावर व्यापार सुरू आहे. अधिकारी, कर्मचारी दहशतीखाली असताना वरिष्ठ अधिकारी मात्र कारवाईची जबाबदारी वाहतूक पोलिसांसह महापालिकेवर ढकलून वातानुकूलित कार्यालयात गप्प बसत आहेत.
भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटकडे जाणाऱ्या रोडवर सुरू असलेल्या अवैध कांदा - बटाट्याच्या व्यापाराविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर अवैध व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बाजार समितीमधील सुरक्षारक्षक व आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांच्या गुंडगिरीविषयी धक्कादायक माहिती लोकमतला दिली आहे. सुरक्षारक्षक व एपीएमसीचे कर्मचारी अवैध व्यापारावर कारवाई करण्यास गेल्यानंतर एक व्यापारी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत आहे. अनेक वेळा भाजी मार्केटच्या कार्यालयात जावून मोठ्या आवाजामध्ये कर्मचाऱ्यांनाच तुम्ही चोर आहात, तुम्हाला बघून घेतो, माझ्यावर कारवाई करणाऱ्यांना सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देवू लागला आहे. या व्यापाऱ्याच्या विरोधात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. अनेक वेळा एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. परंतु संबंधितावर ठोस कारवाई कधीच झाली नाही. वास्तविक कर्मचाऱ्यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. परंतु बाजार समितीचे मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिव व अध्यक्ष या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. वरिष्ठच गंभीर दखल घेत नसल्याने सुरक्षा रक्षकांसह बाजार समितीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना दहशतीखाली वागावे लागत आहे.
अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये गुंडगिरी करणारा हा व्यापारी एपीएमसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करू लागला आहे. आम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर व्यवसाय करत आहोत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ती जागा येत नसल्याने तुम्ही कारवाई करू शकत नसल्याची धमकी दिली जात आहे. यानंतरही कारवाई केल्यास मार्केटमध्ये सेमी होलसेल विक्रेत्यांवर अगोदर कारवाई करा अशी मागणी करत आहे. गुंडगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यापुढे पूर्ण प्रशासन नमते घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होवू लागले आहे. याविषयी अध्यक्ष सतीश सोनी व सचिव शिवाजी पहिनकर यांना विचारले असता आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कांदा - बटाटा विकला जात असून कारवाईची जबाबदारी वाहतूक पोलीस व महापालिकेची असल्याचे सांगून स्वत:ची जबाबदारी दोघांनीही झटकली. वरिष्ठच कठोर भूमिका घेत नसल्याने आम्ही कशी कारवाई करायची, अशी प्रतिक्रिया अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
>वाहतूक कोंडी सुरूच : मुख्य मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये असलेल्या रोडवर अवैधपणे कांदा-बटाटा विक्री सुरू आहे. याशिवाय भाजी मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेरही अवैध व्यापार सुरू असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलीस व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही या विक्रेत्यांवर ठोस कारवाई करत नसून गुन्हेही दाखल करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
>अधिकारी हतबल हस्तक्षेप सुरूच
बाजार समितीचे सुरक्षारक्षक, आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी अवैध व्यापार करणाऱ्यांच्या गुंडगिरीपुढे हतबल झाले आहेत. आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारी, वरिष्ठांना दिलेल्या अहवालाच्या छायांकित प्रतींचा गठ्ठाच ‘लोकमत’कडे दिला आहे. यात व्यापारी कशी धमकी देत आहे, कामामध्ये कशाप्रकारे हस्तक्षेप सुरू आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
>गुन्हे दाखल करा
बाजार समितीमध्ये यापूर्वी संतोष यादव या तरूणाची कार्यकारी अभियंत्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु भाजी मार्केटमध्ये वारंवार सुरक्षा कर्मचारी, आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिली जात असताना अद्याप एकही गुन्हा दाखल केला नसल्याने बाजार समिती सचिव, अध्यक्षांच्या हेतूवरच संशय येवू लागला आहे.