साडेसहाशे लाख टन उस उपलब्ध, ‘उजनी’मुळे २०१८-१९ला बंपर पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:02 AM2017-10-03T04:02:30+5:302017-10-03T04:03:36+5:30
गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. परिणामी कारखान्यांची धुराडी किमान पाच महिने पेटत राहणार, हे निश्चित आहे. साखरेचे उत्पादनही ७० लाख टनांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.
दुष्काळामुळे गतहंगामात उसाचे उत्पादन निम्म्यावर आले. कारखान्यांनी विशेषत: पश्चिम महाराष्टÑातील साखर कारखान्यांनी दिलेला ‘एफआरपी’पेक्षा जादा दर व पाण्याची उपलब्धता यांमुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. २०१५-१६मध्ये ७४२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या तुलनेत उसाची उपलब्धता पाहता यंदा किमान साडेसहाशे लाख टन गाळप होऊ शकते.
उसाअभावी २७ कारखाने बंद!
गतहंगामात उसाची कमतरता असल्याने २७ कारखाने हंगाम घेऊ शकले नव्हते. त्यात पुणे विभागातील १०, तर नांदेड विभागातील १४ कारखाने बंद राहिले.
ऊसगाळपात राज्यात पुणे विभाग अग्रभागी असतो; पण गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप झाल्याने पुणे विभाग मागे पडला. यंदा त्यात वाढ होऊन तो ७५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याची ऊस उत्पादनाची क्षमता २०० लाख टन आहे. त्यात उजनी धरण हाऊसफुल्ल झाल्याने २०१८-१९ या हंगामात उसाचे बंपर पीक येईल.