प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन करणाऱ्यांना दणका

By admin | Published: January 13, 2017 04:48 AM2017-01-13T04:48:22+5:302017-01-13T04:48:22+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने भुलेश्वर आणि काळबादेवी परिसरातील विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या

Bunch of unauthorized producers of commodities | प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन करणाऱ्यांना दणका

प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन करणाऱ्यांना दणका

Next

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने भुलेश्वर आणि काळबादेवी परिसरातील विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकला आहे. यात लोरिअल, लॅक्मे, फेअर अ‍ॅण्ड लव्हली, ओले, रेव्हलॉन, एल18, निविया यांसारख्या नामांकित ब्रँडची तब्बल २ कोटी ३९ लाख २ हजार ६४० रुपयांची बनावट उत्पादने एफडीएने जप्त केली आहेत. या उपलब्ध साठ्यातून सौंदर्य प्रसाधनांचे नमुने चाचणी व विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाला मुंबईत बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशान्वये सहआयुक्त विनीता थॉमस, पी.पी. म्हानवर आणि जे.बी. मंत्री यांनी तीन पथकांसह काळबादेवी आणि भुलेश्वर येथील कारखान्यांवर छापा टाकला. काळबादेवीच्या सारंग स्ट्रीट येथील कारखान्यात मोहम्मद खातीब शेख मोहम्मद जारिफ शेख हा विनापरवाना नामांकित ब्रँड्सची बनावट उत्पादने करत असल्याचे आढळले. कारवाईदरम्यान पथकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने पॅकिंग केलेली आढळली. तसेच, सौंदर्य प्रसाधने बनविण्याची यंत्रेही पकडण्यात आली. मोहम्मद खातीब शेखची चौकशी केली असता या बनावट सौंदर्य प्रसाधनांकरिता कच्चा माल, पॅकिंग मटेरिअल कृष्णा कॉस्मेटिक्सचे प्रवीण ढिल्ला पुरवित असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, या उत्पादनांची विक्री-वितरण ढिल्ला करत असल्याचे आढळून आले. या माहितीनंतर एफडीएच्या पथकाने भुलेश्वर येथील कृष्णा कॉस्मेटिक्सची तपासणी केली. यात प्रवीण ढिल्ला हे विविध नामांकित कंपन्यांच्या नावे उत्पादित केलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा आणि चायना मेक इम्पोर्टेड कॉस्मेटिक्स विनाबिलाने खरेदी करून विक्री करीत असल्याचे आढळले. कृष्णा कॉस्मेटिक्समधून २ कोटी ३८ लाख ९० हजार ६४० रुपयांची उत्पादने जप्त केली.
या प्रकरणी, प्रवीण ढिल्ला याच्या चौकशीनंतर भुलेश्वर येथील राधे कॉस्मेटिक्सचीही तपासणी करण्यात आली. या तपासात विविध नामांकित कंपन्यांच्या नावे उत्पादित केलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा विनाबिलाने विक्री करीत असल्याचे आढळले. राधे कॉस्मेटिक्समधून १ लाख २२ हजार रुपयांची उत्पादने जप्त केली. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल
या प्रकरणी संबंधितांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत नोटीस पाठविली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित कंपन्यांकडे अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे एफडीएने सांगितले. कारवाईदरम्यान साठा जप्त करण्यात अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ही कारवाई गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती. त्या वेळी पोलिसांचे संरक्षण घेऊन साठा जप्त करून एफडीए मुख्यालयात आणण्यात आला.

Web Title: Bunch of unauthorized producers of commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.