बंडोबांची राडेबाजी
By admin | Published: February 4, 2017 04:49 AM2017-02-04T04:49:06+5:302017-02-04T04:49:06+5:30
राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीवरून चांगलीच राडेबाजी झाली. पुण्यात भाजपाकडून तिकीट
मुंबई : राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीवरून चांगलीच राडेबाजी झाली. पुण्यात भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून नाशिकमध्ये शिवसेनेच्या महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांवर माजी महापौरांचे
कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण
झाला. नागपुरात उमेदवारी न मिळालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांच्या घरासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. मुंबईत भाजपा-शिवसेनेची युती तुटल्याने दोन्ही पक्षांत इच्छुकांची तोबा गर्दी झाली. नाराज कार्यकर्त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी ‘एबी’ फॉर्म थेट आयुक्तांकडे देण्याचा मार्ग निवडल्याने नेमके कोणाला तिकीट मिळाले याविषयी संभ्रम होता. भाजपाने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या रिपाइंने तब्बल ९० वॉर्डांमध्ये अर्ज भरल्याने उद्या माघारीची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.
शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीसारख्या प्रमुख पक्षांमधील बंडखोरांनी अखेरच्या दिवशी मिळेल त्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर निष्ठावंत विरोधात बंडखोर अशी ‘दंगल’ रंगली होती. रमाबाई आंबेडकर नगर येथून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे सरचिटणीस विलास रुपवते यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत तीव्र निषेध व्यक्त केला. मुलुंड येथील सेनेचे बंडखोर प्रभाकर शिंदे यांनी भाजपामधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक कार्यालयाबाहेरच शिवसैनिकांनी शिवीगाळ करत जोरदार घोषणाबाजी केली.
अमरावतीमध्ये 'बी'फॉर्म वाटपाच्यावेळी उद्भवलेल्या वादात काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते यांना बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हॉटेल ग्रॅण्ड महफिलमध्ये हा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलीसांत संजय अकर्ते यांंनी तक्रार नोंदविली असून दहा काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नाशिक : सेनेच्या महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुखांबरोबर माजी महापौरांचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतर तणाव निवळला. भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न झाला, तसेच उमेदवारीसाठी महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला.
पिंपरी-चिंचवड : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांत गटबाजी उफाळून आली. ऐनवेळी पत्ता कट झालेल्या काही विद्यमान नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर पक्षांतर करीत व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली.
नागपूर :
उमेदवारांच्या नावांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस समोर आली. तिकीट न मिळाल्यामुळे भाजपाच्या काही इच्छुकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन केले. तर जागावाटपावरून काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. एकूणच प्रचाराची धामधूम सुरू होण्याअगोदरच पक्षांमध्ये राजकीय दंगल सुरू झाल्याचे दिसून आले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना धक्काबुक्की
ठाण्यात भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
तसेच शहराध्यक्ष संदीप लेले यांनाच काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये तिकीटवाटपाची प्रक्रिया पार पाडावी लागली.
तर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात घराणेशाहीची लागण झाल्याने जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.
आमदारांच्या पत्नीने केली बंडखोरी
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी बंडखोरी करून भाजपाच्या तिकिटावर अर्ज भरला. त्याचबरोबर भाजपाकडून तिकीट
न मिळाल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
शिवसेना शहराध्यक्षांच्या कार्यालयातच एका कार्यकर्त्यावर
तलवारीने वार करण्याची घटना घडली. शेवटच्या दिवशी घडलेल्या घडामोडी महापालिकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ करणाऱ्या ठरणार आहेत.