भंगाळेला अखेर बेड्या
By admin | Published: April 1, 2017 04:22 AM2017-04-01T04:22:12+5:302017-04-01T04:22:12+5:30
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संभाषण झाल्याचा दावा करणे
मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संभाषण झाल्याचा दावा करणे हॅकर मनीष भंगाळेला महागात पडले आहे. तपासात त्याने इंटरनेटचा गैरवापर करून बनावट ई-मेल आणि खोटी बिले सादर करून खडसे यांची बदनामी केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी त्याला सायबर पोलिसांनी अटक केली. त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मूळचा जळगाव व सध्या बडोदा येथील रहिवासी मनीष लीलाधर भंगाळे याने काही दिवसांपूर्वी कथितरीत्या पाकिस्तानच्या दूरसंचार खात्याचे (पीटीसीएल) सर्व्हर हॅक करून दाऊद इब्राहिमच्या कराचीतल्या क्लिफ्टन या आलिशान परिसरात असणाऱ्या बंगल्यातून जगभरात करण्यात आलेल्या कॉल्सच्या माहितीचे वर्गीकरण केले. या बंगल्यात दाऊदच्या पत्नीच्या नावे चार दूरध्वनी कनेक्शन आहेत. त्यात ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालखंडात भारतासह जगातील काही देशांमधल्या विशिष्ट मोबाइल क्रमांकावर कॉल करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा मनीष भंगाळे याने केला आहे. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप त्याने केला होता. आपच्या प्रीती मेनन यांनीही हे आरोप करत खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र खडसेंनी हे आरोप फेटाळले होते.
मनीष भंगाळेचा बोलविता धनी जळगावचा - खडसे
हॅकर मनीष भंगाळे याचा बोलविता धनी जळगाव जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती आहे, असा गौप्यस्फोट बोदवड येथे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ स्टेटमेंट भंगाळेच्या पत्नीसह आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. हॅकर मनीषने केवळ साथीदारासोबत बदनामी करण्यासाठी ठाणे येथील इंटरनेटचा गैरवापर करून बदनामी केली. वेळ पडल्यास त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
सर्व आरोप खोटे
अखेर तपासात भंगाळेने केलेले आरोप खोटे असल्याचे समोर आले. इंटरनेटचा गैरवापर करून खडसे यांची बदनामी करण्याच्या हेतूने बनावट इमेल तसेच खोटी टेलिफोन बिले प्रसिद्ध केली. प्राथमिक तपासात भंगाळेचा यात सहभाग समोर आला. त्याच्याविरुद्ध कलम ४६८,४७१सह ६६ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.