बंगला एक,हक्क अनेक
By Admin | Published: November 20, 2014 01:07 AM2014-11-20T01:07:41+5:302014-11-20T01:07:41+5:30
उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला नागपूरमधील ‘देवगिरी’ बंगला यंदाही हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चेत आहे. विद्यमान मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने तो मिळावा म्हणून काही
‘देवगिरी’: उपमुख्यमंत्री नसल्याने ज्येष्ठतेला प्राधान्य
नागपूर: उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला नागपूरमधील ‘देवगिरी’ बंगला यंदाही हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चेत आहे. विद्यमान मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने तो मिळावा म्हणून काही ज्येष्ठ मंत्र्यांनी दावेदारी पुढे केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री नसेल तर ज्येष्ठतेच्या आधारावर या बंगल्याचे वाटप केले जाते. मात्र अंतिम निर्णय यासंदर्भातील समिती घेते.
उपमुख्यमंत्रिपद ही युती-आघाडातील राजकीय सोयीसाठी निर्माण केलेले पद आहे. त्याला कॅबिनेटचाच दर्जा असतो. मात्र सोयीच्या राजकारणात या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यानंतर महत्त्वाचे पद मानले जाते. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी ‘रामगिरी’ तर उपमुख्यमंत्र्यासाठी ‘देवगिरी’ हे शासकीय बंगले राखीव आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नाही. त्यामुळे देवगिरीवर मुक्काम कुणाचा याबाबत चर्चा आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांची हा बंगला मिळावा, अशी इच्छा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री नसेल तर अनुभवातील ज्येष्ठतेच्या प्राधान्यानुसार त्याचे वाटप केले जाते. या निकषात एकनाथ खडसे बसतात. त्यांच्याकडे गृहखात्यानंतरचे दुसरे महत्त्वाचे महसूल खाते आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे आजचे स्थानही दुसऱ्या क्रमांकाचेच आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम देवगिरीवर राहू शकतो. खडसेनंतर सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांची नावे आहेत. युतीच्या काळात मुनगंटीवार मंत्री होते आताही त्यांच्याकडे महत्त्वाचे अर्थ खाते आहे. तावडे प्रथमच मंत्री झाले आहे.
युतीच्या काळात उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे होते.आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादीकडे आले. आता युती आणि आघाडीशिवाय राज्यात प्रथमच भाजप सत्तेत आला आहे. मात्र उपमुख्यमंत्री नसल्याने ‘देवगिरी’वर कोण राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. (प्रतिनिधी)