डबेवाल्यांनाही पडली निवडणुकीची भुरळ
By admin | Published: August 6, 2014 01:09 AM2014-08-06T01:09:56+5:302014-08-06T01:09:56+5:30
गेल्या 125 वर्षापासून मुंबईकरांना जेवणाच्या डब्यामार्फत सेवा देणा:या डबेवाल्यांना विधानसभा निवडणुकीची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Next
मुंबई : गेल्या 125 वर्षापासून मुंबईकरांना जेवणाच्या डब्यामार्फत सेवा देणा:या डबेवाल्यांना विधानसभा निवडणुकीची भुरळ पडल्याचे दिसत आहे. डबेवाल्यांच्या एका प्रतिनिधीने भायखळा विधानसभा मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
संबंधित इच्छुक उमेदवार लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघात भायखळा, घोडपदेव, माझगाव हा गिरणी कामगारांचा पट्टा मोडतो. या ठिकाणी जुन्नर, आंबेगाव, खेड येथील बहुसंख्य लोक आहेत. शिवाय इच्छुक डबेवाल्याचे वडील आणि आजोबा हे डबेवालेच होते. त्यामुळे गावाकडील लोकांचे सहकार्य आणि डबेवाल्यांची सहानुभूती आपल्याला मिळेल, अशी आशा त्याने प्रसिद्धिपत्रकात व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर शिवडी किंवा वरळी विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढण्याची तयारी या डबेवाल्याने दाखवली आहे.
निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच तिकीट मागणा:यांची सुरुवात झाल्याने यंदा रंगत अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र 125 वर्षापासून राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवलेल्या डबेवाल्यांनीही निवडणुकीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक अधिक हटके ठरेल, यात शंकाच नाही. (प्रतिनिधी)