बंटींची शिट्टी, आप्पांची सुटी !
By Admin | Published: December 31, 2015 12:56 AM2015-12-31T00:56:29+5:302015-12-31T00:56:46+5:30
विधान परिषद : सतेज पाटील यांचा दणदणीत विजय; महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव
कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांच्यावर
६३ मतांनी दणदणीत विजय मिळविला. अत्यंत लक्षवेधी लढतीत सतेज यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. सतेज यांना २२०, तर महाडिक यांना १५७ मते मिळाली. पाच मते बाद ठरली. कोणत्याही निवडणुकीत विशिष्ट लकबीमध्ये विजयाची शिट्टी वाजविणाऱ्या महादेवराव महाडिक यांची या पराभवाने सुटी झाल्याची प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच या विजयाचे ‘किंगमेकर’ ठरले. सतेज पाटील, मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची गट्टी महाडिक यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. निकालानंतर पाटील यांच्या समर्थकांनी प्रचंड आतषबाजी करत त्यांची मिरवणूक काढली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही हा विजय उभारी देणारा ठरला. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) सर्व ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील इमारतीत बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पावणेदहा वाजता निकाल जाहीर झाला.
या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून पैशांचा महापूर वाहिला होता. मताला वीस लाखांपर्यंत दर निघाला होता. महाडिक यांनी मतदानानंतर गुलाल मीच घेऊन येणार, असल्याचा दावा केला होता. विरोधकांची मते फोडण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे ते सांगत होते; परंतु प्रत्यक्षात त्यांचे दावे फोल ठरले. सतेज पाटील व महाडिक यांच्यात प्रथमच थेट लढत झाली. त्यात सतेज यांनी महाडिकांना चारीमुंड्या चीत केले.
महाडिक स्वत: काँग्रेसचे आमदार, मुलगा भाजपचा आमदार, पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार असे सर्वपक्षीय राजकारण महाडिक कुटुंबीय करत होते. त्याबद्दल त्यांना कधीच खंत वाटली नाही. उलट त्याचे त्यांना कौतुकच वाटत असे; परंतु या पराभवामुळे महाडिक यांच्या या सर्वपक्षीय राजकारणालाही कोल्हापूरकरांनी चपराक दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. आजपर्यंत तिन्ही लढतींत विरोधक तगडा नसल्यामुळे महाडिक यांचा विजय शक्य झाला.
तोडीसतोड उमेदवार आणि वेगवेगळ्या कारणांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना दुखावल्याने ते सगळे महाडिक यांच्या विरोधात एकवटले व त्यांनी ताकद लावली.
त्यामुळे जिल्ह्णाच्या राजकारणातील महाडिक पर्वाचा अस्त झाला. (प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून मी जिंकावे, ही सामान्य माणसांचीच इच्छा होती. काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेत्यांची एकजूट महत्त्वाची ठरली. हे सर्व नेते माझ्या पाठीशी ताकदीने उभे राहिले म्हणून हा विजय साकारला. दोन्ही काँग्रेस एकदिलाने एकत्र आल्यास काय घडू शकते याचेच प्रत्यंतर या विजयाने आले. माझ्या विजयाने कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ‘स्वच्छ’ झाले.
- सतेज पाटील,
नवनिर्वाचित आमदार, काँग्रेस
राजकारणातील मी एक योद्धा आहे. येणाऱ्या प्रत्येक घटनेशी तितक्याच धैर्याने सामोरे जाणारा आहे. सर्वच क्षेत्रांत हार-जीत ही असतेच. जो निकाल लागला तो मला मान्य आहे; पण मी मैदानातून पळ काढणाऱ्यांपैकी नाही. कार्यकर्ते हे माझे खरे पाठबळ आहे. त्यांच्या पाठबळावरच मी उभा आहे. या निवडणुकीत मतदारांना नेत्यांनी धमकीवजा आदेश दिल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला.
- महादेवराव महाडिक,
पराभूत अपक्ष उमेदवार
का पडले महाडिक..?
सर्वपक्षीय राजकारणाबद्दलची चीड
अतिआत्मविश्वास नडला
महापालिकेतील भाजपची संगत भोवली
काँग्रेसमधील हकालपट्टी
इतर पक्षीय नेत्यांना दुखावल्याचा परिणाम
का जिंकले सतेज..?
काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात
आलेले यश
सर्व पातळ््यांवर ताकदीचा उमेदवार
महापालिका निवडणुकीतील विजय
हसन मुश्रीफ, विनय कोरे व प्रकाश आवाडे यांची भक्कम साथ
पक्षीय मते बांधून ठेवण्याची दक्षता