बिरदवडी रस्ता कचऱ्यात
By Admin | Published: March 1, 2017 12:56 AM2017-03-01T00:56:25+5:302017-03-01T00:56:25+5:30
चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक पाचमुळे खेड तालुक्यातील बिरदवडी परिसरात कचराप्रश्न गंभीर बनत चालला आहे.
आंबेठाण : यापूर्वी आलेले लहान-मोठे कारखाने आणि चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक पाचमुळे खेड तालुक्यातील बिरदवडी परिसरात कचराप्रश्न गंभीर बनत चालला आहे. यापूर्वी गावच्या दक्षिणेला असणाऱ्या खाणीत पडत असलेला कचरा आणि आता वाढत्या नागरीकरणामुळे गावच्या परिसरात साचू लागला आहे. कचऱ्याचे ढीग रस्त्यावर येऊ लागले आहेत.
बिरदवडी गाव हे चाकणपासून हाकेच्या अंतरावर आहे. चाकणच्या वाढत्या नागरीकीकरणाचा परिणाम या गावावर झाल्याचा दिसून येत आहे. गावच्या परिसरात मोठ्याप्रमाणात नागरीकीकरण वाढत असल्याने
त्याचा ताण पायाभूत सुविधांवर
पडत आहे.त्यात कचरा ही मोठी समस्य निर्माण झाली आहे. आजपर्यंत गावच्या दक्षिणेला असणाऱ्या खाणीत टाकला जाणारा कचरा आता रस्त्याच्या कडेला साचत आहे.
चाकण-आंबेठाण रस्त्यावरील मुळेवस्ती आणि पवारवस्ती या परिसरात तर दुर्गंधीने नकोसे
झाले आहे. कचऱ्यात प्लॅस्टिक, हॉटेलमधील उरलेले खाद्य पदार्थ, चिकन सेंटर मधील कोंबड्यांची पिसे, केस अशा अनेक वस्तूंचा या कचऱ्यात समावेश आहे. अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी साइडपट्ट्या खोदल्या होत्या. त्यामुळे त्या खचल्या असून, त्यावर कचरा पडत असल्याने वाहन फसू नये म्हणून अनेक वाहनचालक वाहन रस्त्यावरून खाली उतरवत नाही. त्याचा परिणाम वाहतूककोंडी होण्यावर होत आहे. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर साचत चाललेली ही कचराकुंडी तत्काळ बंद करावी आणि अशा कचराकुंड्या नागरीवस्तीपासून दूर ठिकाणी न्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
>मेलेली कुत्री... शिळे अन्न...
रस्त्याकडेच्या गटारात हा कचरा साचला जात असल्याने या गटारातून जाणारे सांडपाणी मार्ग न मिळाल्याने रस्त्यावरून वाहत आहे. याशिवाय काही ठिकाणी तर मेलेली कुत्री, आंबलेले खाद्य पदार्थ या कचऱ्यात टाकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.
रस्त्याच्या कडेलाच कचरा साचत असल्याने परिसराचे मोठ्याप्रमाणात विद्रूपीकरण होत आहे. या कचऱ्याच्या ढिगावर भटकी कुत्री असतात. याचाही मोठा त्रास होत आहे.