वाहतूक पोलिसांवर केसेसचा भार
By Admin | Published: March 1, 2017 02:48 AM2017-03-01T02:48:37+5:302017-03-01T02:48:37+5:30
नवी मुंबई वाहतूक विभागात काम करणारे पोलीस सध्या प्रचंड तणावाखाली आहेत
कळंबोली : नवी मुंबई वाहतूक विभागात काम करणारे पोलीस सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांच्यावर गतवर्षी केलेल्या कारवाईची बरोबरी करण्याकरिता केसेस करण्याचा मोठा भार आहे. तर केसेस न करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मेमो देण्याचा इशारा देण्यात येत असल्याने वाहतूक पोलिसांकडून खासगीत बोलले जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत नवी मुंबई महापालिका हद्द त्याचबरोबर पनवेल, उरणचा समावेश होतो. या हद्दीत पनवेल-सायन, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा एनएच-४बी हे महामार्ग जातात. याशिवाय ठाणे- बेलापूर, कल्याण-मुंब्रा व पामबीच मार्ग यांसारख्या रस्त्यांचाही समावेश आहे. या परिसरात जेएनपीटी, स्टील मार्केट, एपीएमसी, एमआयडीसी आहे. त्यामुळे वाहनांची सतत ये-जा सुरू असते. परिणामी, वाहतूकनियमनांची मोठी जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. परिमंडळ-२मध्ये कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, खारघर, तळोजा, उरण आणि न्हावा-शेवा या वाहतूक नियंत्रण शाखा आहेत. जेएनपीटी आणि स्टील मार्केट, तसेच जवळपास सर्व महामार्ग पनवेल परिसरातून जात असल्याने या भागात अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते. त्यामुळे वाहतूक नियमन करता करता पोलिसांच्या नाकी नऊ येतात. याशिवाय टार्गेट पूर्ण न झाल्यास वरिष्ठांची बोलणी खावी लागतात.
गतवर्षी कारवाई करण्यात आलेल्या केसेस कागदोपत्री दाखविण्याकरिता प्रभारी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक नियमनापेक्षा कारवाई करण्याकडेच त्यांचा कल दिसत आहे. सिग्नल आणि सर्कलला कर्मचारी उभे राहून वाहनांवर कारवाई करताना दिसतात. महत्त्वाच्या जंक्शनवर तर गेल्या काही दिवसांपासून पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वाहतूक पोलिसांच्या जनजागृतीमुळे हल्ली बहुतांश चालकांकडून नियमांचे पालन करण्यात येते. त्यामुळे हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न लावणे यासारख्या चुकांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कारवाई करणार कोणावर? आणि केसेसे आणायच्या कुठून? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रि या मिळू शकली नाही.
>कोणत्याही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना केसेसचे टार्गेट दिलेले नाही. तो दैनंदिन कामाचा भाग आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे हे आमचे कामच आहे.
- प्रदीप माने,
सहायक पोलीस आयुक्त
वाहतूक शाखा, नवी मुंबई