शेतकरी कामगार पक्षाच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओझे
By admin | Published: February 27, 2017 03:01 AM2017-02-27T03:01:12+5:302017-02-27T03:01:12+5:30
पेणमध्ये शेकापने काँग्रेस-शिवसेनेचे गडकोट भुईसपाट करून एकहाती निर्विवाद वचस्व प्रस्थापित केले आहे.
दत्ता म्हात्रे,
पेण - पेणमध्ये शेकापने काँग्रेस-शिवसेनेचे गडकोट भुईसपाट करून एकहाती निर्विवाद वचस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या पेणच्या पाच जागा व पाली सुधागडमधील एक जागा अशा पेण विधानसभा मतदारसंघातील सहा जागा ज्या शेकापच्या वाट्याला आल्या होत्या त्या सर्वच जागा जिंकून पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी पक्षात आपले वजन वाढविले आहे. पेणकरांना गेल्यावेळी जिल्हा परिषदेत एकही सभापती पद मिळाले नव्हते. त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पेणचे शेकाप कार्यकर्ते आक्रमक झाले असून निलिमा पाटील यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी आग्रही आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापच्या मतदारांचा कौल मिळाला आहे. शेकापच्या विजयी झालेल्या २३ जागांमध्ये पनवेल ८ पैकी ६ जागा, पेण ५ पैकी ५ जागा, सुधागड २ पैकी १, कर्जत ६ पैकी २, अलिबाग ७ पैकी ५, मुरुड २ पैकी १, माणगाव ४ पैकी १ आणि पोलादपूर २ पैकी १ जागी शेकापचे उमेदवार विजयी झालेत. गेल्या वेळी सभागृहात कर्जत तालुक्यात सुरेश टोकरे यांना राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदाचा मान मिळाला. पनवेल अरविंद म्हात्रे यांना शेकापतर्फे उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला; तर वजनदार अर्थ नियोजन व बांधकाम सभापती पद अलिबागमध्ये चित्रा पाटील यांना मिळाले. पेणकरांना मात्र त्यावेळी सत्तेत वाटा मिळाला नव्हता. तरीही काहीही तक्रार न करता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेणचे शेकाप नेतृत्व व कार्यकर्ते पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून गप्प राहिले होते. निवडणुकीच्या घोषणेनंतर बदलेले प्रभाग रचेनेचे जिल्हा परिषद गटात काँग्रेस व शिवसेना यांनी केलेल्या आघाडीची समीकरणे व मतदारांची बेरीज पाहता पेणचा पाबळ गट वगळता इतर चार गटात शेकाप उमेदवार मतदानाच्या आकडेवारीत बरेच पिछाडीवर असतानादेखील आ. धैर्यशील पाटील यांच्या कानमंत्राने जी ऊर्जा मिळाली त्या काँग्रेसचा बलाढ्य मानलेला दादर-रावे गट भुईसपाट झाला. पंचायत समिती सभापती पदाबरोबर तब्बल १५ वर्षांनंतर शेकापने हा गट माजी मंत्री रवी पाटील यांच्या हातातून हिसकावून घेतला. मतदारांचा कौल शिरसावंद्य मानून रवी पाटील यांनी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याचा अर्थ आ. धैर्यशील पाटील व त्यांच्या अर्धांगिनी नीलिमा पाटील यांचा करिष्मा काय आहे याची मतदारांना जाण आहे. उर्वरित गटात शेकापचे उमेदवार रिंगणात उतरवून शेकापने पेण पाठोपाठ सुरेश खैरे यांची सुधागडमधील जागाही दणदणीत विजय मिळवून जिंकली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे की नीलिमा पाटील हे समीकरण सोडवावे लागणार आहे. मतदारांचा कौल शेकापला मिळालेला आहे. त्याहून अधिक म्हणजे राष्ट्रवादीच्या दुप्पट जागा शेकापने जिंकल्या आहेत. नीलिमा पाटील या झेडपी सभागृहातील शेकापच्या वरिष्ठ नेत्या आहेत. अध्यक्षपदाची धुरा त्यांनी मागील काळात यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच त्या वेळी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री रवी पाटील यांचा पराभव धैर्यशील पाटील यांनी करून आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. यामागे नीलिमा पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा मोठा वाटा होता. त्या वेळी झेडपी अध्यक्ष व मंत्रीपद असा राजकीय कलगीतुरा पेणमध्ये नीलिमा पाटील यांनी करून त्या यशस्वीही ठरल्या होत्या. हा राजकीय वाटचालीचा इतिहास शेकापच्या वरिष्ठ नेतेगणांना ज्ञात असणारच. त्यामुळे आताच्या निवडणूक निकालात शेकापच्या विजयात पेणकरांचा मोठा वाटा आहे. मतदारांचा कौल व शेकापच्या सत्ता समीकरणाच्या वाट्यात नीलिमा पाटील यांचं वजन दमदार आहे. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने तीन टर्ममध्ये निवडून आलेल्या नीलिमा पाटील यांना डावलू शकत नाही. त्यामुळेच पेणचे शेकाप कार्यकर्ते सर्व ठिकाणीच पेणलाच अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.