पुलांना झेपेना वाहतुकीचे ओझे
By admin | Published: August 9, 2016 01:45 AM2016-08-09T01:45:35+5:302016-08-09T01:45:35+5:30
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेमुळे पुलांची असणारी दुरवस्था समोर आली आहे. गावागावातील अशा धोकादायक पुलांची दुरुस्ती करणे तातडीने गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील अशा धोकादायक ठरणाऱ्या पुलांवर प्रत्यक्ष पाहणी करुन ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...
बावडा : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नद्यांवरील पुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनावर भीतीचे दडपण जाणवत आहे. याबाबत प्रशासन मात्र अजूनही गाफिलच आहे.
बावडा (ता. इंदापूर) भागातील सराटी येथील नीरा नदीवरील पुलाचे शंभर वर्षांनंतर सन १९९८-९९ ला पुनरुज्जीवन करण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही जड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला कंप फुटतात हीच वस्तुुस्थिती आहे. पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल आहे. त्याचबरोबर भीमा नदीवर असणारा बावडा-गाराकोले जोडणारा पूल आहे. या पुलाची निर्मिती सन २००४ साली झाली आहे. मात्र सातत्याने या पुलाकडे दुरुस्तीसाठी शासकीय पातळीवर कधीच प्रयत्न झाले नाहीत. (वार्ताहर)
वालचंदनगर : वालचंदनगर-जंक्शन या मुख्य रस्त्यावर ४६ फाटा कालव्यावर बांधण्यात आलेला पूल जीर्ण झालेला असल्याने ढासळला आहे. दोन फूट खचल्याने येथे मोठ्या अपघाताला प्रवाशांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. अवजड वाहनांमुळे पूल हलत आहे. रस्त्यावर भेगा पडल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्वरित या मुख्य रस्त्यावरील पूल नवीन करण्यात यावा, अशी मागणी वालचंदनगर-जंक्शन येथून व प्रवाशांतून वेळोवेळी होत आहे.
वालचंदनगर जंक्शन हा मुख्य रस्ता सतत वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून पुणे-सोलापूर, सांगली, सातारा, माळशिरस, शिंगणापूर, दहिवडी, जत, पंढरपूर या मुख्य मोठ्या शहरांना जाणाऱ्या बस गाड्या यांचा मुख्य रस्ता आहे. वालचंदनगर कंपनीच्या शेकडो टन जॉबची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. वालचंदनगर, कळंब येथे महाविद्यालये असल्याने हजारो विद्यार्थी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात. जर हा ४६ नीरा डाव्या कालव्यावरील पूल अचानक खचल्यास मोठ्या अपघाताला प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. पुलावर भेगा पडल्याने हा पूल झोपाळ्यासारखा हलतोय. त्यामुळे प्रवासी पुलावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नीरा डाव्या कालव्यावरील हा पूल खचल्याने रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत. पाटबंधारे विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरणार आहे. त्वरित हा पूल दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.(वार्ताहर)