खारघरमधील अधिराज गार्डन इमारतीमध्ये घरफोडी
By Admin | Published: March 4, 2017 02:37 AM2017-03-04T02:37:41+5:302017-03-04T02:37:41+5:30
मुंबईसह अनेक उपनगरांत झालेल्या घरफोड्या, चोऱ्यांमध्ये चड्डी बनियान टोळीचा हात असल्याचे उघड झाले
पनवेल : मुंबईसह अनेक उपनगरांत झालेल्या घरफोड्या, चोऱ्यांमध्ये चड्डी बनियान टोळीचा हात असल्याचे उघड झाले आहे. उच्चभ्रू वसाहतीत प्रवेश करून हे गुन्हेगार घरातील मौल्यवान ऐवज लंपास करतात. ही घटना खारघर सेक्टर ५ मधील अधिराज गार्डन या उच्चभ्रू वसाहतीत गुरुवारी रात्री ३ ते ४ च्या सुमारास घडली. घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अधिराज गार्डन या बिल्डिंगमध्ये ई विंग २०१ मध्ये राहणाऱ्या अर्चना विवेक भोसले यांच्या घरात ही चोरी झाली. चड्डी बनियान परिधान केलेल्या तीन व्यक्तींनी मध्यरात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी इमारतीत प्रवेश केला. सुमारे तासाभरातच त्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातून महागड्या वस्तू, ज्वेलरी चोरून पळ काढला. विशेष म्हणजे या बिल्डिंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तिघांचे चित्रीकरण झाले आहे. खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर हे या घटनेचा तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. जेव्हा चोरी झाली तेव्हा घरमालक गावी गेले होते. शेजाऱ्यांनी त्यांना चोरीसंदर्भात माहिती दिली.
>खारघरमध्ये घरफोडीत चड्डी बनियान गँगचा हात असल्याची ही पहिलीच घटना आहे. अधिराज गार्डन ही इमारत खारघरमधील पर्वतरांगांच्या हाकेच्या अंतरावर आहे. पर्वतरांगांतच हे चोरटे पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर खारघरमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
>दरोड्यासाठी आलेल्या चौघांना कोपरखैरणे पोलिसांनी केली अटक
बँकेवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या चौघांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी दबा धरून बसल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर झडप टाकण्यात आली. या कारवाईत दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. घणसोली सेक्टर ५ येथे गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली. त्याठिकाणी उभ्या असलेल्या कारमधील व्यक्ती संशयित असून दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक उमेश मुंडे, उपनिरीक्षक कैलास मुंबईकर यांच्या पथकाने त्याठिकाणी धडक दिली.
पोलिसांनी घेरल्याचे समजताच कारमध्ये लपलेल्या ६ जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. श्रीकांत गोडबोले (२२), आकाश हाटकर (२१), सिराज शेख (२९) व दीपक ऊर्फ इंद्र झा (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते सर्व जण मुंबई व ठाणे परिसरातले राहणारे असून सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी बँकेत एकट्या ग्राहकाला फसवून रक्कम लुटण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत.