नव्या रिक्षा दिसल्यास जाळून टाका!
By admin | Published: March 10, 2016 04:05 AM2016-03-10T04:05:54+5:302016-03-10T04:05:54+5:30
केवळ एका उद्योगपतीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र दडल्याचे दिसते त्यामुळे नव्या रिक्षा रस्त्यावर आल्यावर थेट जाळून टाका
मुंबई : केवळ एका उद्योगपतीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र असून यात मोठे अर्थकारण दडल्याचे दिसते त्यामुळे नव्या रिक्षा रस्त्यावर आल्यावर थेट जाळून टाका, असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना देऊन पुन्हा तोडफोडीचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सूचविले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दशकपूर्ती सोहळा येथील षणमुखानंद सभागृहात झाला. मराठी मुलांनाच रिक्षा, टॅक्सीचे परवाने मिळाले पाहिजे. अर्थात केवळ मराठी आली म्हणजे परवाना देऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले. ७० हजार रिक्षांचे ७० टक्के परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या आणि भाजपाच्या राज्यात फारसा फरक दिसत नाही,असे ते म्हणाले. फार काही बदलले नसेल तर मग काँग्रेसवालचे चांगले होते, असा टोलाही त्यांनी लगावला. मनातले सर्व ८ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बोलेन, असे सांगत त्यांनी काही मुद्दे राखून ठेवले. बजाज कंपनीत ७० हजार रिक्षा तयार आहेत. रोज तीन हजार रिक्षा परवाने देण्याचे आदेश देण्यात आले आहे. बजाज कंपनीसोबत ७० हजार रिक्षांसाठी १,१९० कोटींचा व्यवहार होणार आहे, असा आरोप त्यांनी केला. नवीन परवाना असलेल्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर चालक आणि प्रवाशांना बाहेर काढून त्या जाळायच्या. नवीन परवाना असलेल्याच रिक्षा जाळायच्या, नाहीतर जातानाच रिक्षा जाळायला सुरूवात कराल, असेही ते म्हणाले.
> सत्ताधारी खोटं बोलून सत्तेवर आले. आताही ते लोकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. काँग्रेसच्या काळात सराफांना भाजपाने पाठिंबा दिला, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर कर लादला, अशी टीका त्यांनी केली.
रस्त्यावरील होर्डिंग काढणे योग्य आहे, मात्र महापालिकेच्या जागेवरील होर्डिंग राजकीय कार्यकर्त्यांना परवडत आहेत का, हे पाहण्याची जबाबदारीही न्यायालयाची आहे. न्यायाधीश असणे म्हणजे मोगलाई नाही. प्रत्येक गोष्टींत त्यांनी नाक खूपसण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यापासून सर्वांच्या आयुष्यात ‘बॅडपॅच’ होता. लतादीदी सोडून सगळ््यांना अपयश आले. पक्षाच्या १० वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार आले. चढ-उतार येतातच. आपल्यालाच आपला उद्धार करावा लागेल, असेही मार्गदर्शन त्यांनी केले.