उघड्यावर जाळला जातोय कचरा
By Admin | Published: June 8, 2017 01:03 AM2017-06-08T01:03:59+5:302017-06-08T01:03:59+5:30
कोंढवा बुद्रुक येथील शांतीवन सोसायटीसमोर टाकलेला कचरा सर्रास जाळला जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
उंड्री : कोंढवा बुद्रुक येथील शांतीवन सोसायटीसमोर टाकलेला कचरा सर्रास जाळला जात आहे. कचरा जाळल्याने होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
या धुरामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, श्वास घेण्यास त्रास होणे व इतर श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. ज्या ठिकाणी कचरा पेटविला जात आहे, त्या ठिकाणी असलेली दोन मोठमोठी झाडेही कचऱ्यामुळे जाळली जात आहेत. ही झाडे या ठिकाणी अनेक वर्षांपासून आहेत.
तसेच, या झाडांची घनदाट सावली बाजूच्या रस्त्यावर पडत असल्याने उन्हाळ्यात वाहनचालक या भागातून जाताना सुखावतात. या दोन्ही झाडांचे बुंधे जमिनीपासून साधारणत: ४ ते ६ फूट इतके जळाळले आहेत. झाडाच्या बुंध्याचा कोळसा होत आहे. कचरा असाच जाळला गेला तर ही झाडे कोसळून पडतील.
या ठिकाणी महानगरपालिकेने उघड्यावर कचरा टाकण्यास
प्रतिबंध करावा व कायमस्वरूपी कचरापेटी ठेवून नियमित
कचरा उचलून न्यावा, अशी
मागणी परिसरातील नागरिक
व शांतीवन सोसायटीतील
रहिवासी करीत आहेत.
दुर्गंधीचा त्रास
कोंढवा बुद्रुक गावातून व्हीआयटी शिक्षण संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शांतीवन सोसायटी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत कायमच कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सोसायटीतील सदस्य, आजूबाजूचे रहिवासी व कोंढवा बुद्रुकमधून मार्केट यार्ड, बिबवेवाडी या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागतोच, पण कचरा जाळल्याने त्याच्या दुष्परिणामास तोंड द्यावे लागत आहे. साचलेल्या कचऱ्यात असलेल्या ओल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे.