बरणी तोंडात अडकल्याने कुत्र्याची फजिती
By admin | Published: October 23, 2016 10:01 PM2016-10-23T22:01:53+5:302016-10-23T22:01:53+5:30
फजिती झाली तर हसणारे अधिक असतात, मात्र मदत करणारे फार कमीच असतात. प्लॅस्टीकची बरणी एका कुत्र्याच्या तोंडात अडकल्याने त्याची प्रचिती येथे आली.
ऑनलाइऩ लोकमत
नंदूरबार, दि. 23 - फजिती झाली तर हसणारे अधिक असतात, मात्र मदत करणारे फार कमीच असतात. प्लॅस्टीकची बरणी एका कुत्र्याच्या तोंडात अडकल्याने त्याची प्रचिती येथे आली.
याबाबत वृत्त असे की, म्हसावद येथे शुक्रवारी एका कुत्र्याच्या तोंडात काहीतरी खाण्याच्या लालसेपोटी चक्क प्लॅस्टीकची बरणी मानेपर्यंत अडकली. तीन दिवसापर्यंत तो कुत्रा साईबाबा मंदिर, विठ्ठल मंदिर, कोंडवाडा चौक भागात त्याच अवस्थेत केविलवाणा होवून पळतच होता. त्याचे खाणे-पिणे बंद झाले. अनेकांनी टिंगल-टवाळी केली. कुत्र्याची फजिती पाहून काहींनी हळहळ व्यक्त केली तर काहींनी हसण्याचा आनंद लुटला. मात्र मदतीचा हात कोणीच दिला नाही. शेवटी रविवारी सकाळी चौधरी मित्र मंडळाचे सुधाकर पाटील, किरण चौधरी, जयंत पाटील यांनी कटरच्या सहाय्याने बरणी कापून त्याला मोकळे केले. त्यांना रघुनाथ चौधरी, शिवाजी पाटील, सचिन चौधरी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)