आदिवासी मुलींच्या हाती 'लालपरीचं स्टेअरींग', राज्यभरात 163 महिला बस ड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:04 AM2019-08-24T11:04:56+5:302019-08-24T11:05:22+5:30
एसटी महामंडळाने यापूर्वीच महिलांसाठी ही खूशखबर दिली होती. महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.
मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला वाहकांची भरती करुन सरकारने महिलांना प्रोत्साहन दिले. तर, महिला कुठेही कमी नाहीत, हे या वाहक महिलांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. अनेकदा, आपल्या तान्हुल्या बाळाला कडेवर घेऊन महिला वाहक बसमध्ये आपले कर्तव्य बजावतानाचे फोटो आपण पाहिले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार आणखी एक पाऊल पुढे जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती सोपविण्या येत आहे.
एसटी महामंडळाने यापूर्वीच महिलांसाठी ही खूशखबर दिली होती. महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यानुसार, 2406 पदावर महिलांची भरती केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. मात्र, आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली आहे. त्यासाठी आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागात या महिलांकडून बस चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश महिला उमेदवार या आदिवासी भागातील असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन, सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या महिला एसटी बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला.
Pune: Maharashtra Govt has selected women from the tribal community to drive Maharashtra State Road Transport Corporation(MSRTC) buses in the state. 163 women have been selected for this pilot project.Former President Pratibha Patil inaugurated the initiative yesterday pic.twitter.com/7J0Vt3L6uS
— ANI (@ANI) August 24, 2019