शाळेच्या बसची वाहनांना धडक
By Admin | Published: November 4, 2016 01:01 AM2016-11-04T01:01:03+5:302016-11-04T01:01:03+5:30
जीजी इंटरनॅशनल स्कुल बसने पादचाऱ्यासह अन्य वाहनांना धडक दिली.
पिंपरी : जीजी इंटरनॅशनल स्कुल बसने पादचाऱ्यासह अन्य वाहनांना धडक दिली. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास साई गार्डन चौकात हा अपघात झाला. पायी जात असलेला गजेंद्र प्रभुलाल जैन (वय २४, रा़ तिरूपती सोसायटी, महात्मा फु लेनगर, चिंचवड) हा युवक जखमी झाला, तर मोटार आणि चार दुचाकींचे नुकसान झाले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसचालक संदीप दगडू वडवालेकर (वय ४८, रा़ साईनाथ पार्क, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे़
दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्याचा गुरूवारी पहिलाच दिवस होता. बसमध्ये जीजी इंटरनॅशनल स्कूलचे सात विद्यार्थी होते़ शाळेतील विद्यार्थी घरी सोडविण्यासाठी बस जात असताना साई गार्डन चौकात आल्यावर रस्त्याने पायी जात असलेल्या जैन यांना बसचालकाने धडक दिली़ त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले़ चालकाने बस तशीच पुढे नेल्याने अपघातात एक मोटार आणि चार दुचाकींचे नुकसान झाले आहे़ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार बसचालकाला फिट आल्यामुळे अपघात घडला़ पोलिसांनी बसचालकाकडे चौकशी केली असता आपल्याला काही आठवत नसल्याचे त्याने सांगितले़
>या प्रकरणी शाळेतील वाहतूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भारती भागवानी यांनी लोकमतशी बोलताना बसचालकाला चक्कर आल्यामुळे अपघात घडला, असे स्पष्टीकरण दिले. अपघातात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. बसचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला चक्कर कशामुळे आली? हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.