अरुणाचलमधील बनावट नोंदणीच्या बस महाराष्ट्रात; १८ ट्रॅव्हल्स बस आढळल्या दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 09:17 AM2023-08-22T09:17:24+5:302023-08-22T09:17:58+5:30

फायद्यासाठी प्रवाशांचे जीव धोक्यात; RTO तपासणीत धक्कादायक प्रकार उघडकीस

Buses with fake registration in Arunachal running in Maharashtra 18 travel buses found guilty | अरुणाचलमधील बनावट नोंदणीच्या बस महाराष्ट्रात; १८ ट्रॅव्हल्स बस आढळल्या दोषी

अरुणाचलमधील बनावट नोंदणीच्या बस महाराष्ट्रात; १८ ट्रॅव्हल्स बस आढळल्या दोषी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्याबाहेरून मुंबईत येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये बनावट नोंदणीच्या ट्रॅव्हल्स बसचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

समृद्धी मार्गावरील ट्रॅव्हल्सच्या अपघातानंतर नवी मुंबई आरटीओने केलेल्या तपासणीत अरुणाचल प्रदेशातील १८ ट्रॅव्हल्सची नोंदणी बनावट असल्याचे तसेच आपत्कालीन दरवाजा बंद करून त्या ठिकाणी प्रवाशांची बैठक व्यवस्था केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सोमवारी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

समृद्धी मार्गावरील भरधाव खासगी बसचा अपघात होऊन प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर आरटीओने राज्यभरातील ट्रॅव्हल्सच्या बस संबंधात तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यामार्फत नवी मुंबईतून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात होती. त्यामध्ये काही खासगी ट्रॅव्हल्समध्ये मागील आपत्कालीन दरवाजा बंद करून त्या ठिकाणी प्रवाशांची वाढीव बैठक व्यवस्था केल्याचे आढळले.

बहुतांश ट्रॅव्हल्सची अरुणाचल प्रदेशात नोंदणी होती. काही ट्रॅव्हल्स बस जप्त करून त्यांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये या बसच्या चेसीसमध्ये खाडाखोड करून बनावट नोंदणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरटीओच्या पथकाने तब्बल १७५ ट्रॅव्हल्स तपासल्या असता त्यापैकी १८ ट्रॅव्हल्सच्या बस चेसीसमध्ये खाडाखोड करून, बनावट कागदपत्रांद्वारे अरुणाचल प्रदेशमध्ये नोंदणी झाल्याचे उघड झाले.

फायद्यासाठी प्रवाशांचे जीव धोक्यात

या ट्रॅव्हल्स मालकांकडून आर्थिक फायद्यासाठी प्रवाशांचे जीव धोक्यात घालून महाराष्ट्रात ट्रॅव्हल्स चालविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस व आरटीओ अधिक तपास करत आहेत.

Web Title: Buses with fake registration in Arunachal running in Maharashtra 18 travel buses found guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.