सेनेतील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!
By admin | Published: November 5, 2014 04:32 AM2014-11-05T04:32:36+5:302014-11-05T04:32:36+5:30
शिवसेनेला किती मंत्रीपदे मिळणार हे स्पष्ट झाले नसतानाच विधान परिषदेतील दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत यांना मंत्रीपदी आपली वर्णी लागावी, असे वाटू लागले आहे
मुंबई : शिवसेनेला किती मंत्रीपदे दिली जाणार, कोणती खाती मिळणार याबाबत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असताना पक्षातील इच्छुकांनी मात्र गुडघ्याला बाशिंग गुंडाळले आहे. मंत्रीपदासाठी निवडून आलेल्या आमदारांऐवजी विधान परिषदेतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने विधानसभेतील आमदारांना विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय अधिक उचित वाटू लागला आहे.
शिवसेना-भाजपामधील मंत्रीपदाच्या चर्चेबाबत पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई यांना विचारले असता, सकारात्मक चर्चा सुरु असून भाजपाप्रणीत सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर होण्यापूर्वी शिवसेना यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करील, असे देसाई यांनी सांगितले.
शिवसेनेला किती मंत्रीपदे मिळणार हे स्पष्ट झाले नसतानाच विधान परिषदेतील दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत यांना मंत्रीपदी आपली वर्णी लागावी, असे वाटू लागले आहे. विधान परिषदेतील मंडळींच्या गळ््यात मंत्रीपदाची माळ पडणार असेल तर सत्तेत सहभागी कशाला व्हायचे, अशी तक्रार विधानसभेतील शिवसेनेचे सदस्य करु लागले
आहेत.
भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा मातब्बर पक्षांबरोबर दोन हात करून निवडून आल्यानंतरही जर मंत्रीपदे मागील दाराने सभागृहात प्रवेश करणाऱ्यांना दिली जाणार असेल तर अशी सत्ता नको, असे विधानसभा सदस्यांचे मत आहे. मंत्रीपदाकरिता इच्छुक विधान परिषद व विधानसभा सदस्य दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरबारात हजेरी लावून आपली खुंटी बळकट
करू पाहत असल्याचे बोलले
जाते. (विशेष प्रतिनिधी)