पोलिसी जाचातून व्यापाऱ्याची आत्महत्या!
By admin | Published: July 10, 2015 02:33 AM2015-07-10T02:33:08+5:302015-07-10T02:33:08+5:30
पोलिसी जाचातून तरुण व्यापाऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक करीत पोलिसांची दोन वाहनेही
सोनपेठ (जि़परभणी) : पोलिसी जाचातून तरुण व्यापाऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक करीत पोलिसांची दोन वाहनेही पेटवून दिली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करीत चार फैरी झाडल्या. त्यानंतरही संतप्त जमावाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीवरही दगडफेक केल्याने गुरुवारी दिवसभर सोनपेठ शहरात तणावाचे वातावरण होते़ दरम्यान, पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोनपेठ येथे भेट दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़
मुरलीधर हाके यांचे सोनपेठमध्ये किराणा दुकान आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री या दुकानावर छापा टाकून गुटखा ताब्यात घेतला होता. हाके यांचा मुलगा विठ्ठल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून गुरुवारी सकाळी त्याला सोडून दिले. घरी आल्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येबाबत कळताच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. पोलिस ठाण्यासमोर जमाव जमला. नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक तिडके, जमादार सुरेश पाटील, शिपाई लटपटे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी जमावाने केली. त्यातूनच दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करीत चार फेैरी झाडल्या.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे सोनपेठकडे येत असताना त्यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. यावरही हा जमाव थांबला नाही. ठाण्याच्या परिसरातीलच पोलिस कर्मचाऱ्याची मोटारसायकल व सहाय्यक पोलीस निरीक्षकाची खाजगी कार पेटवून दिली. ही दोन्ही वाहने भस्मसात झाली. निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाच्या काचाही फोडण्यात आल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नियती ठाकर शहरात दाखल झाल्या. ही माहिती मिळताच पुन्हा एकदा दगडफेक झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबियांच्या जबाबाची नोंद घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)