रुंदीकरणात व्यापाऱ्यांचे चांगभले
By admin | Published: May 17, 2016 04:16 AM2016-05-17T04:16:50+5:302016-05-17T04:16:50+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत बाधित झालेल्या व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली जोमाने वाढीव बांधकाम सुरू आहेत.
प्रशांत माने,
कल्याण-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत बाधित झालेल्या व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली जोमाने वाढीव बांधकाम सुरू आहेत. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान हे वास्तव पहावयास मिळत असून, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेने जानेवारीत रेल्वेस्थानक परिसराकडे जाणाऱ्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेली दुकाने व इमारतींच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. या कारवाईत ३१२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांच्या दुकानांचे बांधकाम बाधित होत असल्याने त्यांनी ही कारवाई थांबवावी म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. त्यासाठी त्यांनी भाजपाचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही कल्याणमध्ये पाचारण केले होते. परंतु महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई यशस्वीपणे पार पाडली.