व्यापाऱ्यांनो, जीएसटीची चिंता नको !

By Admin | Published: August 11, 2016 02:47 AM2016-08-11T02:47:45+5:302016-08-11T02:47:45+5:30

विविध करांमुळे देशात व्यापारी चिंताग्रस्त झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जीएसटी लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे अनेक कर जातील.

Businessmen, do not worry about GST! | व्यापाऱ्यांनो, जीएसटीची चिंता नको !

व्यापाऱ्यांनो, जीएसटीची चिंता नको !

googlenewsNext

पुणे : विविध करांमुळे देशात व्यापारी चिंताग्रस्त झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जीएसटी लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे अनेक कर जातील. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जीएसटीची चिंता न करता सचोटीने व्यापार करावा, असा सल्ला अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मंगळवारी व्यापाऱ्यांना दिला.
‘दि पूना मर्चंट्स चेंबर’च्या वतीने व्यापारमहर्षी बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक विजयकुमार बागमार यांना राज्यस्तरीय पुरस्कार, नौपतलाल साकला यांना जिल्हास्तरीय, अभय संचेती यांना शहरस्तरावरील, तर पोपटलाल ओस्तवाल यांना सभासदांमधून दिला जाणारा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कै. वि. ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्काराने ‘लोकमत’चे मुख्य वार्ताहर अविनाश थोरात यांना, तर पत्रकार मंदार गोंजारी यांना आदर्श चॅनल वार्ताहर पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, आमदार मेधा कुलकर्णी, उद्योजक द्वारका जालान, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र बांठिया उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, की शासनाने जकात, एलबीटी रद्द केला आहे. जीएसटी आल्यानंतर अनेक कर जातील. याची चिंता व्यापाऱ्यांनी करू नये. आम्ही जे सांगू तेच करू. विकासदरात राज्याने मोठी प्रगती केली असून, पहिल्या तीन राज्यांत समावेश झाला आहे. राज्यातील उद्योजक, व्यापारी, सेवाक्षेत्रात काम करणाऱ्यांमुळे हे शक्य झाले.
पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात भुसार बाजार, टिंबर मार्केट असे बाजार शहराबाहेर सुरू करण्यासाठी ४०० ते ५०० जागा उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी मागणी महापौर जगताप यांनी केली. कुलकर्णी म्हणाल्या, अन्नधान्यावरील जीएसटी माफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवू. जीएसटी आल्यानंतर एक दिवसाचे अधिवेशन घेऊन आवश्यक नियमावली तयार केली जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. बागमार व साकला यांनी या वेळी बाबा पोकर्णा यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साकला यांनी चेंबरच्या रिलिफ फंडाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.
जीएसटीतून सर्व स्थानिक कर वगळण्याची मागणी ओस्तवाल यांनी केली. चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Businessmen, do not worry about GST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.