अधिवेशनावर उधळपट्टी! भाड्याच्या वस्तुंवर २ कोटी; चमचे, ब्लँकेट, प्लॅस्टिकचे मग, गाद्याही घेतल्या भाडेतत्त्वावर
By अतुल कुलकर्णी | Published: December 14, 2017 06:08 AM2017-12-14T06:08:10+5:302017-12-14T07:05:40+5:30
प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ हजार रुपये खर्च केले आहेत.
मुंबई : प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ हजार रुपये खर्च केले आहेत. एवढ्या खर्चात या वस्तू विकतच मिळाल्या असत्या, असे या विभागातील काही अधिका-यांचे म्हणणे आहे.
अधिवेशनासाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त येत असताना, गतवर्षी खासगी सुरक्षा रक्षकांवर ३६ लाख रुपये खर्च केले होते. यंदाही तोच कित्ता गिरविण्यात आला आहे. वर उल्लेखलेल्या किरकोळ वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सुमारे दोन कोटीचे टेंडर काढले. शिवाय, ही बाब गुप्त राहावी, यासाठी टेंडरवर ‘कॉन्फिडेंशियल’ (गोपनीय) असा उल्लेख केला आहे. या वस्तू दर वेळी भाडेतत्त्वावर घेण्यापेक्षा त्या कायमस्वरूपी विकत घेतल्यास स्वस्त पडतील, असा सल्ला देणा-या अधिका-यांना या व्यवहाराच्या प्रक्रियेतूनच बाजूला केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
- नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग वारेमाप उधळपट्टी करत असल्याची बाब गेल्या वर्षीही ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती.
टीव्हीचे भाडे आणि बाजारमूल्य
२१ इंची कलर टीव्ही बाजारात साधारणपणे १३ हजाराला आणि ३२ इंची एलसीडी टीव्ही १९ हजारांना मिळत असताना, अधिवेशनासाठी २१ इंची ३९० टीव्ही आणि ३२ इंची २४८ टीव्ही संच २१ दिवसांसाठी भाड्याने घेण्यासाठी ६३,३०,०३० रुपयांचे टेंडर काढले आहे.
हेच टीव्ही संच विकत घेतले गेले असते, तर त्यासाठी ९७,८२,००० रुपये लागेल असते.
काय काय भाड्याने घेतले?
22000- वुलन ब्लँकेट, गाद्या, बेडशीट, उशा
2200 स्टीलची कॉट
200 - प्लॅस्टिक ड्रम
250 - लोखंडी कढई
170 - हँड वॉश बेसिन
200 - लोखंडी झारे
200 - तवे
60 - मसाला दळणयंत्र
1200 - प्लॅस्टिक बकेट, प्लॅस्टिक जग, प्लॅस्टिक मग
1700 - लोखंडी टेबल
1500 - स्टील टेबल
5000 - स्टीलचे चमचे
- ३१ वस्तुंसाठी २ कोटी ६४ हजार ८९१ रुपयांचे टेंडर बांधकाम विभागाने काढले आहे.