"...पण साहेब मनातून तुम्ही आमच्या भूमिकेला नक्कीच पाठिंबा देत असाल," एकनाथ शिंदेनी ट्विट केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:44 PM2022-06-23T21:44:15+5:302022-06-23T21:44:36+5:30
"आम्हाला बंडखोर म्हणू नका हो. तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. बघा आम्ही लढाई कशी लढतो ते. एवढीच अपेक्षा आहे."
शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आपल्याला तब्बल 46 आमदारांचा पाठींबा असल्याचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी शिंदे गटाची मुख्य मागणी आहे. यातच आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी ट्विट केला आहे. या व्हिडिओत शिरसाट आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिरसाट म्हणत आहेत, "हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले आपल्याला सांभाळणार आहेत? शक्य नाही साहेब. आमची भूमिका आज कदाचित तुम्हाला पटत नसेल, पण साहेब मनातून तुम्ही या भूमिकेला निश्चितच पाठिंबा देत असाल. ही माझी खात्री आहे. म्हणूनच आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाललो आहोत. त्यामागची भूमिकाच ही आहे, की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय."
तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या -
"ज्या हिंदूत्वाच्या विचाराने शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उभे केले होते, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी लढायला आम्हाला शिवसेना प्रमुखांनी उभे केले होते. ती भूमिका आता आम्हाला वठवायची आहे. साहेब तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आम्हाला बंडखोर म्हणू नका हो. तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. बघा आम्ही लढाई कशी लढतो ते. एवढीच अपेक्षा आहे."
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
आम्हाला रामलल्लाचं दर्शन का नाही -
हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले, तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका, असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवलात? आम्हाला रामलल्लांचे दर्शन का घेऊ दिले नाही? असेही शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.