‘आता मात्र सर्वांसमोर…’, वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:37 IST2026-02-27T16:35:07+5:302026-02-27T16:37:04+5:30
Sushil Karad News: वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आज समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट केली आहे. तसेच सुशील कराडच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

‘आता मात्र सर्वांसमोर…’, वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. दरम्यान, वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आज समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट केली आहे. तसेच सुशील कराडच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
सुशील कराडने फेसबूकवर ही पोस्ट लिहिली असून, त्यात त्याने ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार’, असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता सुशील कराड नेमकं काय बोलणार आणि काय गौप्यस्फोट करणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुशील कराड हा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा मुलगा आहे. संतोष देखमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता, दोन्ही न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळले होते. त्यानंतर वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, पण तिथेही त्याला दिलासा मिळाला नव्हता.
संतोष देशमुख यांचा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला होता. हा खून खंडणी प्रकरणातून झाल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी सुरुवातीपासून करत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चे आणि आंदोलनांनंतर तपासाला गती मिळाली आणि अखेर आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. आरोपी स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत असले, तरी सरकारी पक्षाने तो फेटाळला आहे.