मृतांच्या संख्येपेक्षा जास्त लाकडाची खरेदी
By admin | Published: December 7, 2014 12:30 AM2014-12-07T00:30:36+5:302014-12-07T00:30:36+5:30
महापालिकेत विविध कामात भ्रष्टाचाराचे आरोप होणे काही नवे नाही. बरेच आरोप राजकीय हेतूनेही असतात. पण महापालिकेत दहनघाटावर लाकडांचा पुरवठा करण्यातही घोटाळा झाला आहे.
प्रत्येक प्रेतामागे ७५ किलोंचा घोटाळा : अंकेक्षण अहवालात ताशेरे
नागपूर : महापालिकेत विविध कामात भ्रष्टाचाराचे आरोप होणे काही नवे नाही. बरेच आरोप राजकीय हेतूनेही असतात. पण महापालिकेत दहनघाटावर लाकडांचा पुरवठा करण्यातही घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे ही बाब कुण्या राजकीय व्यक्तीने नव्हे तर २०११-१३ दरम्यान झालेल्या लेखा परीक्षण अहवालाने समोर आणली आहे. एक प्रेताच्या अंत्यविधीसाठी ३०० किलो लाकूड दिले जाते. मात्र, कंत्राटदाराने जाळलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा जास्त लाकडाची खरेदी केल्याचे दाखवून प्रत्येक प्रेतामागे ७५ किलो लाकडाचे जास्ती पैसे उचलले आहेत. मयतीच्या लाकडात घोटाळा करणाऱ्यांवर महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहन घाटांवर मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जाळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने २०१०-११ व २०११-१२ या या वर्षांसाठी अंदाजे ४६८५ मे. टनाची १ कोटी २६ लाख ७ हजार ३३५ रुपये खर्च अपेक्षित असलेली निविदा बोलावली. महेश सेल्स यांची निविदा २८ मे २०१० रोजी स्थायी समितीने मंजुर केली. १५ जून २०१० रोजी करारनामा करण्यात आला. महेश सेल्स यांच्याकडून २०११-१२ मध्ये ४८५७.८६५ मे.टन लाकूड खरेदी करून १ कोटी ३० लाख ७५ हजार ३५८ रुपये प्रदान करण्यात आले. २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांसाठी ६६७५ मे. टनासाठी १ कोटी ९० लाख २३ हजार ७५० रुपये अपेक्षित खर्चासाठी निविदा मागविण्यात आली. यावेळीही महेश सेल्स कॉर्पोरेशन यांची प्रति मे.टन ४४९१ रुपये दराची निविदा ७ आॅगस्ट २०१२ रोजी स्थायी समितीने मंजूर केली. परंतु वाटाघाटीमध्ये १६ आॅक्टोबर २०१२ रोजी महेश सेल्स कॉर्पोरेशन यांनी ४४९१ रुपये प्रती टन ऐवजी ४०४१ रुपये प्रति टन दराने पुरवठा करण्यास संमती दिली व आयुक्तांनी १९ आॅक्टोबर २०१२ रोजी निविदा मंजूर केली. २०१२-१३ मध्ये ५५८६.६२ मे.टन लाकूड खरेदी करून १ कोटी ७४ लाख ११ हजार ६५९ रुपये प्रदान करण्यात आले.
मात्र, लेखा परीक्षण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मृतांच्या नोंदवहीत असलेली मृतांची आकडेवारी व प्रत्यक्षात घाटावर देण्यात आलेली लाकडे यात मोठी तफावत आढळून आली आहे. एका प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घाटांवर ३०० किलो लाकडे दिली जातात. मात्र, याचा हिशेब केला अशता २०११-१२ मध्ये दहन केलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा तब्बल ९४७.३६५ टन लाकूड जास्त देण्यात आल्याचे दाखवून कंत्राटदाराने महापालिकेकडून अतिरिक्त पैशाची उचल केली. २०१२-१३ मध्ये देखील १५५४.९२ टन लाकूड जास्त देण्यात आल्याचे दाखवून अतिरिक्त पैशाची उचल केली आहे. २०११-१२ मध्ये २६२९ रुपये प्रति टन प्रमाणे हिशेब केला असता २५ लाख ४९ हजार ३५९ रुपये व २०१२-१३ मध्ये सरासरी दर ३३६६ रुपये प्रमाणे ५२ लाख ३३ हजार ८६० रुपये जास्तीचे घेण्यात आले आहेत. अशा प्रकारे कंत्राटदाराने २०११ ते २०१३ या दोन वर्षात प्रत्यक्षात पुरवठा केलेल्या लाकडापेक्षा तब्बल ७७ लाख रुपये जास्तीचे उचलल्याचे अंकेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)