5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:33 PM2022-10-27T15:33:03+5:302022-10-27T15:34:03+5:30
अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
मुंबई - देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे झगमगाट आहे. पणतीच्या दिव्यांनी उजळणारं अंगण आता इलेक्ट्रीक्सच्या लायटींगने उजळून निघत आहे. सगळीकडे इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढला आहे. त्यामुळे, साहजिकच घरातील लाईट बिलावरही त्याचा परिणाम होत असून वीज वितरण कंपन्यांचाही लोड वाढत आहेत. त्यातूनच अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
माणसाला प्रत्येक वस्तू सहज आणि एका क्लिकवर, एका बटणावर सुरू झालेली हवी आहे. त्यामुळेच, पंखा, एसी, मिक्सर, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, गाडी, वॉशिंग मशिन्स, बॅटरी, फ्रीज, ओव्हन सगळं काही इलेक्ट्रॉनिक्सवर आधारीत आहे. या सर्व उपकरणांसाठी गरज असते ती लाईट म्हणजेच वीजेची. अगदी सकाळच्या पाणी तापवण्याच्या हीटरपासून ते गुडनाईट म्हणणाऱ्या लिक्वीडपर्यंत सर्वकाही उपकरणे वीजेवरच चालतात. या उपकरणांच्या वापरामुळे आपल्या घरातील लाईटचे बीलही जास्त येत. तर, कंपन्यांवरही वीजेचा अतिरीक्त भार पडतो. त्यामुळेच, कोरोना कालावधीत लाईट बिलावरुन मोठी समस्या निर्माण झाली होती.
स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची "ऊर्जा बचत क्षमता" जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा. #fiveslStarRating#Electricequipment#SaveEnergy#savemoney#savingspic.twitter.com/hMci850JGH
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) October 27, 2022
कोरोना कालवधी अनेकांच्या घरातील लाईटचं बील वाढीव आल्याने महावितरणविरोधात अनेकांनी मोर्चे काढले होते. तर, काहींनी महावितरणच्या कार्यालयांना टाळेही ठोकले होते. त्यामुळेच, वीजेची बचत हाच बिल कमी येण्याचा पर्यायी मार्ग आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ''स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची "ऊर्जा बचत क्षमता" जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा'', असे आवाहन एमएसईबीने केले आहे.