चिक्की विकत घेताय.. जरा थांबा..! एफडीएच्या कारवाईत धक्कादायक बाब उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:48 PM2019-01-03T12:48:12+5:302019-01-03T12:56:49+5:30
शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून चिक्कीची विक्री करणा-या मगनलाल चिक्कीच्या कारखान्याची तपासणी करून एफडीएने कारवाई केली.
- राहूल शिंदे -
पुणे: बाजारात विकल्या जाणा-या बंद पाकिटातील अन्न पदार्थांची तपासणी एनएबीएल लॅब किंवा शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र, मगनलाल चिक्कीसह लोणावळ्यातील आणि महाबळेश्वर व पुणे शहरातील चिक्की उत्पादकांकडून उत्पादित केलेली चिक्की खाण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबत प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने पुणे व परिसरातील चिक्की उत्पादकांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. सर्वांना खाण्यायोग्य आणि निर्भेळ चिक्की मिळावी.तसेच चिक्कीच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने एफडीएकडून आवश्यक कारवाई केली जात आहे.
शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून चिक्कीची विक्री करणा-या मगनलाल चिक्कीच्या कारखान्याची तपासणी करून एफडीएने कारवाई केली. तसेच चिक्की तयार करताना आवश्यक काळजी घेत नसल्याचे दिसून आलेल्याने मगनलाल चिक्कीच्या विक्रीवर व उत्पादनावर निर्बंध घालण्यात आले.सर्व तृटींची पूर्तता केल्यानंतरच चिक्कीच्या विक्रीस व उत्पादनास परवानगी दिली जाईल, असे एफडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच चिक्कीची तपासणी प्रयोगशाळेतून करून घेण्यासह सर्व त्रुटींची पूर्तता करून मगनलाल चिक्की उत्पादकांनी एफडीएकडे आपले शपथपत्र सादर केले. त्यामुळे मगनलाल चिक्कीचे उत्पादन व विक्री पुन्हा एकदा सुरू झाली आहे. परंतु, येत्या आठवड्याभरात एफडीएतर्फे लोणावळ्यातील सर्व चिक्की उत्पादकांची तपासणी केली जाणार आहेत. त्यात कायद्याचे पालन न करणा-या चिक्की उत्पादकावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच चिक्की हा पदार्थ आवडतो.केवळ दुकानांमध्येच नाही तर रेल्वेमध्ये व बस स्थानकांवरही चिक्कीची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाला खाण्यायोग्य निर्भेळ चिक्की मिळावी या उद्देशाने एफडीएने लोणावळ्यातील सर्व चिक्की उत्पादकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी चिक्की उत्पादकांनी घेणे बंधनकारक आहे. चिक्की तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी,इतर पदार्थांचा दर्जा,चिक्की तयार करणा-या कर्मचा-यांकडून राखली जाणारी स्वच्छता आणि त्यांची आरोग्य तपासणी करणे.तसेच चिक्कीची विक्री करण्यापूर्वी एनएबीएल लॅब किंवा शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून चिक्कीची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.
---------------
चिक्कीची तपासणी प्रयोगशाळेतून होत नाही
चिक्की तयार केल्या जाणारे ठिकाण स्वच्छ असणे आवश्यक आहे.तसेच तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पोषक वातावरणात अन्न पदार्थ तयार करणे कायद्याने बंधनकारक आहे.तसेच विक्रीसाठी बाजारात आणल्या जाणा-या बंद पाकिटातील अन्न पदार्थाची तपासणी प्रयोगशाळेतून करून घेणे गरजेचे आहे.मात्र,चिक्की उत्पादकांकडून ही काळजी घेतली जात नाही,असेही सुरेश देशमुख म्हणाले.
...........................
कोंढव्यात चिक्की उत्पादकावर कारवाई
एफडीएतर्फे त्रिशुल चिक्की उत्पादकावर कारवाई करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा कायद्यानुसार चिक्की तयार करणा-या कर्मचा-यांनी स्वच्छ कपडे परिधान केलेले असावेत. परंतु, कोढवा येथी संबंधित कर्मचा-यांनी अस्वच्छ कपडे घातले होते.त्यांची आयोग तपासणी करण्यात आली नव्हती.चिकी तयार केल्या जाणा-या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केले नव्हते.तसेच तयार केलेली चिक्की कोणत्याही प्रयोग शाळेतून तपासून घेतली जात नव्हती.त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी आय.एस.हवालदार यांनी येथे कारवाई केली,असे एफडीएचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
...................
लोणावळ्यासह महाबळेश्वरमधील चिक्की उत्पादकांकडून अशा प्रकारची काळजी घेतली जात नाही.त्यामुळे एफडीएने लोणावळ्यातील तिवारी फुट्स अॅड प्रॉडक्ट या चिक्की उत्पादकाच्या कारखान्याची तपासणी केली.त्यात अनेक तृटी अढळून आल्याने संबंधित उत्पादकावर कारवाई केली.तसेच उत्पादन घेण्यावर व विक्रीवर निर्बंध घातले.काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथील चिक्की उत्पादकांवरही कारवाई करण्यात आली आहे.त्यात महाबली चिक्की,मामा चणा आणि चिक्की,विल्सन चिक्की ,धनंजय चिक्की यांच्यासह इतर आठ उत्पादकांच समावेश आहे,असेही देशमुख यांनी सांगितले.