बाय पोस्ट तलाक नामंजूर
By admin | Published: May 14, 2015 01:32 AM2015-05-14T01:32:25+5:302015-05-14T01:32:25+5:30
तब्बल २६ वर्षे संसार केल्यानंतर पत्नी आपल्याला वैवाहिक सुख देण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार एका पतीला झाला. या साक्षात्कारापोटी त्याने
पुणे : तब्बल २६ वर्षे संसार केल्यानंतर पत्नी आपल्याला वैवाहिक सुख देण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार एका पतीला झाला. या साक्षात्कारापोटी त्याने अचानकच एक दिवशी तिला पोस्टाने तलाकनामा पाठविला. मात्र अशा प्रकारचा तलाक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गी. अ. पांडे यांनी नामंजूर केला.
अब्बास (५०) आणि मुमताज (४३) यांचा फेब्रुवारी १९८८मध्ये निकाह झाला. या दोघांना मुले असून एका मुलाचे लग्नही झाले आहे. मात्र अब्बासचा स्वभाव संशयी असून तो सतत मुमताजला शिवीगाळ करून अपमानित करीत असे. शिवाय मुमताज आपल्याला वैवाहिक सुख देऊ शकत नाही असा आरोप करून तिचा छळ करीत असे. त्याने विनाकारण मुमताजविरूद्ध पोलीस तक्रारीही केल्या. त्याने आता पोस्टाने तलाकनामा पाठविला व संबंध संपुष्टात आल्याने आपण दुसरे लग्न करण्यास मोकळे झाल्याचे कळविले. त्यामुळे मुमताजने अॅड. अफरोज शेख यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण, पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा तलाक नामंजूर केला.
विशिष्ट पद्धतीनुसार, बैठक घेऊन, इद्दतचा कालखंड आणि तीन वेळा तलाकचा उच्चार याप्रमाणे हा तलाक झालेलाच नसल्याने पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला असे म्हणता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने पत्नीला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. तसेच पत्नीला राहत्या घरात राहण्यास परवानगी द्यावी किंवा तिची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करून भाड्यापोटी ५ हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले.