शासन साइटवर ‘बाइट’ला मनाई
By admin | Published: January 25, 2017 03:13 AM2017-01-25T03:13:57+5:302017-01-25T03:13:57+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांचे दोन ते तीन मिनिटांचे ‘व्हिडीओ बाइटस्’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यास मनाई
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांचे दोन ते तीन मिनिटांचे ‘व्हिडीओ बाइटस्’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. आयोगाने सोमवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. त्याचप्रमाणे, राज्यातील महापालिका निवडणुकीसाठीही उपरोक्त आदेश जारी करण्यात आले असून, या व्हिडीओ बाइट्सच्या प्रसिद्धीची जबाबदारी महापालिका प्रशासनावर सोपविली आहे.
यापूर्वीच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची दोन ते तीन मिनिंटांची व्हिडीओ क्लिप तयार करून, या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन सादर करणार होते. हे व्हिडीओ बाइट जिल्हा परिषदेच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार होते. मतदारांचा टक्का वाढावा, लोकशाही सुदृढ होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून यावेत, यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स.सहारिया यांनी अमरावती दौऱ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले होते. उमेदवारांच्या बाइट्स आता स्वयंसेवी संघटना घेणार आहेत.