सी-लिंकचा प्रवास उड्डाणपुलावरून
By admin | Published: September 21, 2016 02:31 AM2016-09-21T02:31:53+5:302016-09-21T02:31:53+5:30
व्यावसायिक कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स आणि विविध दूतावासांची कार्यालये असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वाहनांची कायम वर्दळ असते.
मुंबई : विविध आर्थिक संस्था, व्यावसायिक कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स आणि विविध दूतावासांची कार्यालये असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे येथे होणारी कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल व परिसरात चार उड्डाणपूल व एका रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. यातील दोन उड्डाणपूल सी-लिंकपर्यंत येण्या-जाण्यासाठी बांधण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. उड्डाणपूल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पॅडेको कंपनी लिमिटेडची नेमणूक करण्यासाठी मंजुरीही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वांद्रे-कुर्ला संकुलास भेट देणाऱ्यांची संख्या आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संकुलासह कलानगर जंक्शनजवळ मोठी वाहतूककोंडी होते. या कोंडीवर उपाय म्हणून चार उड्डाणपूल आणि एका रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. कलानगर जंक्शनजवळील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यातील दोन उड्डाणपूल आणि धारावीपासून सी-लिंककडे जाणाऱ्या वळण रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चरची नेमणूक करण्यात आली आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रुझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडवण्याकरिता बांधण्यात येणाऱ्या दोन उन्नत मार्गांच्या कामांसाठी पॅडेको कंपनीची नेमणूक करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात दोन उड्डाणपूल बांधताना यातील एक उड्डाणपूल संकुलापासून सी-लिंकपर्यंत जाईल तर दुसरा उड्डाणपूल सी-लिंककडून संकुलाच्या दिशेने परत येईल. त्याचबरोबर धारावी ते सी-लिंक असा रस्ताही पहिल्या टप्प्यात बांधला जाईल. दुसऱ्या टप्प्यात संकुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारा व धारावीपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा द्वितीय स्तरावरील उड्डाणपूल (उन्नत मार्ग) बांधणार असल्याचे एमएमआरडीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>उन्नत मार्गाचा फायदा
दोन उन्नत मार्गांच्या बांधकामांवर पॅडेको कंपनीकडून देखरेख ठेवण्यात येईल.
एका १.३ किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवरील वाहतूककोंडीवरील उपाय सापडणार आहे. तर कुर्लातील कपाडीयानगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोलापर्यंतच्या ३.८९ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या उन्नत मार्गामुळे सांताक्रुझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडविणे शक्य होईल.