ग. रा. कामत यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: April 20, 2015 02:41 AM2015-04-20T02:41:23+5:302015-04-20T02:41:23+5:30
संगीत नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत अलौकिक कामगिरी करून मोहोर उमटवणाऱ्या
मुंबई : संगीत नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत अलौकिक कामगिरी करून मोहोर उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव दूरदर्शनतर्फे केला जातो. दूरदर्शनचे महासंचालक मुकेश शर्मा, अभिनेता विक्रम गोखले, निवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल आणि आॅल इंडिया बिझनेस असोसिएशनचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी ‘सह्याद्री नवरत्न पुरस्कार’ जाहीर केले.
यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ग. रा. कामत यांना जाहीर झाला आहे. ‘स्वररत्न’ पुरस्काराने प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना गौरविण्यात येईल. ‘रत्नदर्पण’ पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना प्रदान करण्यात येईल; तर जयंत सावरकर ‘नाट्यरत्न’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
यंदाचा ‘सह्याद्री साहित्यरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाहीर झाला आहे; तर ‘रत्नशारदा’ पुरस्काराने डॉ. तारा भवाळकर यांना गौरविण्यात येईल. ‘चित्ररत्न’ पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांना जाहीर झाला आहे. वाहन उद्योगात विशेष ठसा उमटवणाऱ्या ‘भारत फोर्ज’ या पुण्यातील कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना ‘सह्याद्री रत्नवैभव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिल्पकार बी.आर. खेडकर यांना ‘कलारत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे; तर ‘रत्नसौरभ’ पुरस्कार जलतरणपटू वीरधवल खाडे यांना जाहीर झाला आहे.
या वर्षीच्या नवरत्न पुरस्कार निवड समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त करुण श्रीवास्तव, निवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि ज्येष्ठ उद्योजक विजय कलंत्री यांचा समावेश
होता. (प्रतिनिधी)