लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 08:29 PM2019-12-27T20:29:58+5:302019-12-27T20:38:51+5:30
भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा
पुणे : देशामध्ये महागाई, मंदी, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), भारतीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणण्यात आले. विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप एक प्रकारे गाजर दाखवितआहे . तर विरोधकांनाही अशांतताच हवी आहे, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी उद्योजक अजय शिर्के, ट्रस्टचे विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार व अॅड. नीला गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, जगामध्ये खुप असमतोल निर्माण झाला आहे. अमेरिकेसह युरोपातील देशांमध्येही घुसखोरी सुरू आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारताची फाळणी धार्मिकतेवर आधारीत होती. वांशिक वादातून बांग्लादेशाची निर्मिती झाली. आता तिथून दररोज घुसखोरी होत आहे. इतर देश घुसखोरांना गोळ््या घालत आहेत. परंतु आपण मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार करतो.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी स्वत:ला मुस्लिम राष्ट्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे अशा देशांमधील मुस्लिमांव्यतिरिक्त इतर धर्मियांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये हिंदु, बौध्द, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन यांचा समावेश आहे. हेच मुद्दे अधिक वादग्रस्त ठरले आहेत. शेजारील तीन देशांमधून आलेल्या मुस्लिमांची चौकशी करूनच त्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. घुसखोरांमध्ये सर्वाधिक मुस्लिम आहेत. तसेच विध्वंसक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी झालेच पाहिजे. पण वेळ कोणती हा वादाचा मुद्दा आहे. त्यामागे राजकीय कारणे आहेत. सध्या तत्वनिष्ठ राजकारण राहिले नाही. हे स्वार्थाचे राजकारण आहे.
-------
भाजपाचा मेंदु आरएसएस
‘सीएए’मधून केवळ मुस्लिम घुसखोरांना वगळण्यात आल्याने हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अजेंडा असल्याची शंका निर्माण झाली आहे. भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हिंदुत्व हा आरएसएसचा अजेंडा असून ही भाजपाची कमकुवत बाजू आहे विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल केली जात आहे, अशी टीका करत अॅड. आव्हाड यांनी अशा स्थितीत नागरिकत्व कायदा गंभीरपणे घ्यायला हवा, नागरीकत्व सांभाळायलाच हवे, असे सांगितले.