कोराडी येथे 2 बाय 660 मेगावॉट वीज निर्मिती नवीन संच उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 09:21 PM2019-03-05T21:21:08+5:302019-03-05T21:21:38+5:30
दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला
मुंबई/नागपूर - दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली.
वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून 20 टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही आज मान्यता देण्यात आली. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेच्या सर्वाधिक मागणी 25 हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच 19 व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी 20363 मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक मागणीची नोंद यंदा झाली आहे.
आज महाराष्ट्र विजेच्या क्षेत्रात परिपूर्ण झाला असल्यामुळेच राज्य भारनियमन मुक्त झाले आहे. आगामी काळातही महाराष्ट्रृात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये व जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशानेच ऊर्जा विभागाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव शासनासमोर सादर केला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.
महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन 2023-24 मध्ये 27000 पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन 2023-24 साठ़ीचा 25 हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता 2019 मेगावॅट विजेची तूट भासू शकते.
महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता 13602 मेगावॉट असून त्यापैकी 10170 मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी महानिर्मितीचे 1680 मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता 2 बाय 660 मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक 1 ते 4 बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.
या प्रकल्पात संच क्रमांक 1 काम पूर्ण होण्यासाठी 45 महिने व संच क्रमांक 2 पूर्ण होण्यासाठी 51 महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 80 टक्के रकक्म कर्ज रुपाने तर 20 टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.
संच क्रमांक 6 चे नूतनीकरण
जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक 6 चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 486 कोटी व महाराष्ट्र शासनाकडून 96 कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास 563.12 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.