मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर, नारायण राणेंसाठीही मुहूर्त शोधून ठेवलाय - दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:34 AM2017-10-12T03:34:05+5:302017-10-12T03:34:35+5:30
मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर गेले आहेत. दौ-यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.
अहमदनगर : मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर गेले आहेत. दौ-यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नारायण राणे यांच्यासाठीही मुहूर्त शोधून ठेवलेला आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांना सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार चांगला असल्यानेच शहरी भागांसोबतच ग्रामीण भागांतही भाजपाला चांगले यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर नसली तरी निवडणुकीत राजकीय पक्षांचेच पॅनेल होते. त्यामुळे भाजपाला मिळालेला कौल स्पष्ट असल्याचा दावाही त्यांनी केला.
कर्जमाफीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने ५ नोव्हेंबरपासून रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे, याबाबत दानवे म्हणाले, कर्जमाफीचा मसुदा सर्वच राजकीय पक्षांची विचार विनिमय करून तयार केला होता. ते आंदोलन करणार असतील तर
तो त्यांचा राजकीय विचार आहे. तांत्रिक अडचणी दूर होताच कर्जमाफीचे ३४ हजार २०० कोटी शेतकºयांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होतील. फटाक्यांवरील निर्बंधाबाबत दानवे म्हणाले, प्रदूषणमुक्त दिवाळी झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबतचा मसुदा सरकारला मिळाल्यावर सरकारकडून त्याबाबत धोरण स्पष्ट केले जाईल, असे ते म्हणाले.