Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 04:01 PM2022-08-09T16:01:24+5:302022-08-09T16:02:56+5:30
'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे.'
मुंबई: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर विरोधी विविध प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारला टोला लगावला आहे.
'राज्यातील जनता बेजार झाली होती'
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, 'सरकार स्थापन होऊन एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, पण आता मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. चाळीस दिवसांपासून राज्यातील जनता बेजार झाली होती. राज्यात सरकार माय बाप नाही अशी भावना होती. आता तरी सरकारने शासकीय यंत्रणा कार्यरत करावी', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
'आम्ही कुणालाही क्लिनचीट दिली नाही'
ते पुढे म्हणाले की, 'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. त्यांनी आता निर्णय घेतला आहे. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपनेच आंदोलन केले, पण आता त्यांनीच राठोड यांना सरकारमध्ये घेतले आहे. आम्ही महाविकास आघाडी काळात कुणालाही क्लिनचीट दिली नाही. आम्ही अशी घाई केली नाही, असा खुलासाही जयंत पाटलांनी केला.
'संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद'
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आनंद व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'संजय राठोड महाविकास आघाडीत मंत्री असताना आम्ही सातत्याने सांगत होतो की, त्यांच्यावर अन्याय होतोय. मात्र, भाजपने कोणतेही भान न ठेवता राळ उठवली होती. बेछूट आरोप केले होते. मात्र, त्या आरोपांचे नंतर काय झाले, असा सवाल उपस्थित करत आता संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.